Join us

गोवंडीत ५८० खाटांचे रुग्णालय; शताब्दी रुग्णालयाच्या आवारात इमारत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:18 PM

दर्जेदार रुग्णसेवांपासून वंचित पूर्व उपनगरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मुलुंड पाठोपाठ गोवंडी येथे ५८० खाटांचे नवीन रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई : दर्जेदार रुग्णसेवांपासून वंचित पूर्व उपनगरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मुलुंड पाठोपाठ गोवंडी येथे ५८० खाटांचे नवीन रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. शताब्दी रुग्णालयाच्या आवारातच दहा मजली नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ५०१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.पूर्व उपनगरात राजावडी रुग्णालय व्यतिरिक्त पालिकेचे दुसरे मोठे अद्ययावत रुग्णालय नाही. यामुळे मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालय अद्ययावत करण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आता गोवंडीमधील शताब्दी रुग्णालय इमारतीच्या आवारातच नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. मे. ग्लोबल झोन सॅनिटरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला याचे काम देण्यात आले आहे. रुग्णालयाच्या कामासाठी ५०१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये संपूर्ण नवीन इमारतीचे आरसीसी स्वरूपाचे बांधकाम, इमारतीसंबंधित इतर सर्व कामे, सभोवतालच्या परिसराचे सुशोभिकरण, विद्युत व यांत्रिकी कामे, आगप्रतिबंधक यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा, मॉड्युलर ओटी व मेडिकल गॅस यंत्रणा, न्युमॅटिक ट्रान्सपोर्ट यंत्रणा अशा सुविधा केल्या जाणार आहेत.