Join us

बालरक्षक मोहिमेतून ५८० मुले पुन्हा शिक्षण घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 3:43 AM

शालेय शिक्षण विभागाच्या बालरक्षक या नव्या संकल्पनेला मुंबई शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई : शालेय शिक्षण विभागाच्या बालरक्षक या नव्या संकल्पनेला मुंबई शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेसाठी शिक्षकांनीही आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद दिला असून, २४५ शिक्षकांनी मोहिमेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. शाळाबाह्य मुले तसेच शाळेत अनियमित असणाऱ्या मुलांना शाळेत आणण्यासाठी तसेच त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने बालरक्षक ही संकल्पना सुरू केली असून त्यातून ५८० मुले शाळेत दाखल झाली आहेत.शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी राज्यातील नागरिकांपासून अधिकाºयांपर्यंत कोणतीही व्यक्ती बालरक्षक बनून या मुलांच्या शिक्षणात योगदान देऊ शकणार आहे. यासाठी राज्यभरात ही मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेस मुंबईतील अनुदानित शाळांतील शिक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत शिक्षण निरीक्षक विभागाने तिन्ही विभागांत बालरक्षक चळवळ कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेस मुंबईतील अनुदानित शाळांमधील ३८९ शिक्षक उपस्थित होते. याअंतर्गत विशेष प्रशिक्षण, शिक्षण हमी कार्ड, सतत गैरहजर विद्यार्थी पंचनामा शाळाव्यवस्थापन समिती त्यांचा सहभाग आदी माहिती दिली. राज्याच्या विविध भागांत शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अद्यापही प्रचंड मोठे आहे. मध्यंतरी शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून शाळाबाह्य मुलांची राज्यातील संख्या पुढे आली होती. मुंबईतही हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे विविध ठिकाणी राहणारी तसेच स्थलांतरितांची मुले तसेच झोपडपट्टी, रस्ते, सिग्नल आदीपर्यंत बालरक्षक पोहोचून मुंबईत ५८० मुले शाळेत दाखल केली असल्याची माहिती समन्वयक वैशाली शिंदे यांनी दिली.>बालरक्षकांच्या नोंदणीसाठी संकेतस्थळशाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्याचे काम बालरक्षकांनी केले आहे. या मोहिमेत शिक्षकांचा सहभाग वाढला तर आणखी मुलांपर्यंत पोहोचता येईल, असेही त्या म्हणाल्या. ज्या शिक्षकांना बालरक्षक म्हणून नोंदणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने संकेतस्थळ सुरू केले असून त्यावर आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.