मुंबई : मुंबईतील सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी पालिकेने ऑगस्टमध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, मुंबई महापालिकेने गुणवत्तापूर्ण कामांसाठी कठोर अटी व शर्ती ठेवल्याने पाचही निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रस्ते सुधारणेसह एक वर्षात खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टीने महापालिकेने ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी पाच निविदा निमंत्रित केल्या होत्या. यामध्ये शहर १, पूर्व उपनगरे १ आणि पश्चिम उपनगरे ३ अशा एकूण पाच निविदांचा समावेश होता. या निविदांमध्ये समाविष्ट कामांसाठी ५ हजार ८०६ कोटी रुपये इतका खर्च होता.
काय होत्या अटी आणि शर्ती?
- संयुक्त भागीदारीला परवानगी नाही
- कामे दुसऱ्या कंत्राटदाराकडे हस्तांतरित करण्यास परवानगी नाही
- राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचा अनुभव हवा
- काम पूर्ण झाल्यावर ८० टक्के रकमेचे अधिदान
- उर्वरित २० टक्के रकमेचे दोषदायित्व कालावधीत अधिदान
- कामाचा दोषदायित्व कालावधी १० वर्षे
- गुणवत्तेत दोष आढळल्यास दंडाची कारवाई
- कंत्राटदाराची स्वत:ची यंत्रसामग्री आवश्यक
- कंत्राटदाराकडील कामगार कमीत कमी १ वर्ष कंपनीच्या पे-रोलवर असावा
- देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक साईटवर बसविणे. प्रत्येक रस्त्यावर वारंवार चर खोदू नये, यासाठी डक्ट बांधणे