Join us

५८४ प्रकल्पांना महारेराच्या नोटिसा, तिमाही प्रपत्र अद्ययावत न केल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 6:11 AM

स्थावर संपदा अधिनियमानुसार विकासकांनी प्रकल्पात दर तीन महिन्याला  किती नोंदणी झाली.

मुंबई : स्थावर संपदा अधिनियमानुसार विकासकांनी प्रकल्पात दर तीन महिन्याला  किती नोंदणी झाली, किती पैसे आले, किती खर्च झाला इत्यादी माहितीचा तपशील असलेले प्रपत्र  संकेतस्थळावर नोंदवणे, अद्ययावत करणे अत्यावश्यक आहे. या प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या किंवा करणाऱ्या ग्राहकाला घरबसल्या ही प्राथमिक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी ही तरतूद आहे. जानेवारीत नोंदवलेल्या नवीन  ७४६ पैकी ५८४ विकासकांनी ही माहिती अद्ययावत केली नसल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. या सर्वांना महारेराने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

जानेवारीत महारेराकडे नोंदवलेल्या सुमारे  २२ हजार ४४९ कोटींच्या या प्रकल्पांत ५० हजार २८८ सदनिका आहेत. या विकासकांनी ही माहिती, तिमाही अहवाल म्हणून २० एप्रिलपर्यंत अद्ययावत करणे अपेक्षित होते. सर्व प्रपत्र विनाविलंब अद्ययावत असावे म्हणून याबाबतचा निष्काळजीपणा, दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी महारेराची भूमिका आहे.   

महा‘विसंवाद’ आघाडी! पवारांवरील टीका अन् नेते पळविण्यावरून वादाची ठिणगी

बिल्डरांकडून ही पूर्तता अपेक्षित...

महारेरा नोंदणी क्रमांक निहाय संबंधित प्रकल्पाचे राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागते. ग्राहकांकडून नोंदणी पोटी येणाऱ्या रकमेतील ७० टक्के रक्कम या खात्यात ठेवावी लागते. संबंधित प्रकल्पाच्या कामासाठी पैसे काढताना किती काम झाले, किती खर्च अपेक्षित आहे हे प्रकल्पाचे प्रकल्प अभियंता, वास्तुशास्त्रज्ञ आणि सनदी लेखापाल यांनी प्रमाणित केलेले प्रपत्र रक्कम काढताना सादर करावे लागतात. त्याचवेळी हे प्रपत्र महारेराकडे ही पाठवणे आवश्यक असते .अर्थात त्या तिमाहीत पैसे काढलेले नसल्यास तसे आणि या कालावधीत किती पैसे बँकेत भरले याचा तपशील स्व-प्रमाणित प्रमाणपत्र संकेतस्थळावर देणे आवश्यक असते.  

टॅग्स :मुंबई