रेल्वे अपघातांतील ५९ मृतदेह बेवारस
By Admin | Published: December 5, 2014 12:30 AM2014-12-05T00:30:32+5:302014-12-05T00:53:34+5:30
शहरात वर्षभरात रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी ५९ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. रेल्वे पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही या मयतांच्या वारसांचा शोध लागलेला नाही
नवी मुंबई : शहरात वर्षभरात रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी ५९ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. रेल्वे पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही या मयतांच्या वारसांचा शोध लागलेला नाही. रेल्वेमधून पडून अथवा रूळ ओलांडताना रेल्वेची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत नोव्हेंबर अखेरपर्यंत रेल्वे अपघातात एकूण १९४ जणांचा मृत्यू झाला. शहरातील रेल्वे मार्गाभोवती कुंपण घालण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिक सर्रास रेल्वे रूळ ओलांडतात. तर काही ठिकाणी पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. तुर्भे, घणसोली, सानपाडा, रबाळे या ठिकाणी रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक आहे. रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या पूर्वेकडे औद्योगिक क्षेत्र तर पश्चिमेकडे नागरी वस्ती असे विभाजन झाले आहे. त्यामुळे नागरी वस्तीमधून ठाणे - बेलापूर मार्गावर तसेच औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी पादचाऱ्यांना रूळ ओलांडावा लागतो. रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग असूनही तेथील असुविधेमुळे ते बंद आहेत. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या १९४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर १२९ जण गंभीर जखमी झालेले आहेत. एकूण मयतांपैकी ५९ जणांची ओळखच पटलेली नसल्याने त्यांची बेवारस अशी नोंद रेल्वे पोलिसांकडे आहे.
या मृतांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याच्या दृष्टीने परिसरातील हरवलेल्या व्यक्तींची देखील माहिती मिळवण्यात आली आहे. मात्र सर्व स्तरांवरील प्रयत्नांअंतीही वारसाविनाच त्यांचा अंत्यविधी झाला आहे. सध्या तीन बेवारस मृतदेह रेल्वे पोलिसांकडे असून २ राजावाडी येथे तर १ वाशी येथील पालिका रुग्णालयात आहे. तपास घेऊनही या मयतांच्या नातेवाइकांचा शोध लागत नसल्याने या व्यक्ती शहराबाहेरील असल्याची शंका आहे. (प्रतिनिधी)