मुंबई : मुंबईत गेल्या साडेपाच वर्षांत ५९ हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी अवघे चार टक्के आरोपी दोषी झाले असल्याचे माहिती अधिकारातून समोर आली आहे. तसेच, ३७ कोटी २४ लाख ८१ हजार २१४ एवढी रक्कमच तक्रारदार व्यक्तींना परत करण्यात यश आले आहे.
१ जानेवारी २०१८ ते जुलै २०२३ पर्यंत आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या ५९४ प्रकरणांममध्ये ५९ हजार ७५ कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. या कालावधीत तब्बल ३१९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली, तर केवळ १४ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे दोषसिद्धी झाल्याचे प्रमाण केवळ चार टक्के आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे मुंबईत साडेपाच वर्षांत ५९ हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असताना केवळ ३७ कोटी २४ लाख एवढी रक्कमच तक्रारदार व्यक्तींना परत करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या ५९ हजार कोटी रुपयांच्या तुलनेत तक्रारदाराला परत मिळालेली रक्कम एक टक्काही नाही.
२६४ गुन्ह्यांचा तपास बंद या कालावधीत २६४ आरोपपत्रे, समरी आणि क्लोजर रिपोर्ट्स दाखल करण्यात आले आहेत. म्हणजे निम्मी प्रकरणे तपासाधीन आहेत. दाखल ५९४ गुन्ह्यांपैकी २६४ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून त्यात आरोपत्र अथवा गुन्ह्याचा तपास बंद केल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायायलयात सादर करण्यात आला आहे. म्हणजेच निम्म्याहून अधिक प्रकरणे अद्यापही तपासाधीन असल्याचे दिसून येते.
चौकशी महत्त्वाची आरटीआयद्वारे ही माहिती उघड करणारे द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशनचे कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखीन कठोर पावले उचलत, निर्दोष सुटत असलेल्या आरोपींबाबत चौकशीही होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.