'डीएसकें' कडून ५९० कोटींचा गंडा! स्टेट, सेंट्रलसह अन्य बँकांची फसवणूक; CBI कडून दोन गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 07:06 AM2023-04-14T07:06:04+5:302023-04-14T07:06:57+5:30

सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात सीबीआयने दोन गुन्हे दाखल केले

590 crores fraud from DSK State Central and other banks cbi registered case | 'डीएसकें' कडून ५९० कोटींचा गंडा! स्टेट, सेंट्रलसह अन्य बँकांची फसवणूक; CBI कडून दोन गुन्हे दाखल

'डीएसकें' कडून ५९० कोटींचा गंडा! स्टेट, सेंट्रलसह अन्य बँकांची फसवणूक; CBI कडून दोन गुन्हे दाखल

googlenewsNext

मुंबई : 

सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात सीबीआयने दोन गुन्हे दाखल केले असून, या प्रकरणी त्यांनी स्टेट बँक, सेंट्रल बँक व अन्य काही बँकांची मिळून एकूण ५९० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्या कुटुंबातील काही सदस्यही त्यांच्या कंपनीत संचालक आहेत. त्यांच्यावरही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन स्वतंत्र गुन्हे असून, यापैकी पहिला गुन्हा हा स्टेट बँकेने १ जुलै २०२० रोजी दिलेल्या लेखी पत्राच्या आधारे दाखल करण्यात आला आहे. यानुसार, स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, विजया बँक यांनी डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला एकूण ६५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र, यापैकी ४३३ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे.

तर दुसऱ्या प्रकरणी सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने १ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या लेखी पत्राच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा डी. एस. कुलकर्णी यांच्या समूहाची उपकंपनी असलेल्या डी. एस. के. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लि. या कंपनीविरोधात दाखल करण्यात आला असून, या कंपनीने अंदाजे १५६ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. डिझायनिंग, गेमिंग, ॲनिमेशन आदींचे प्रशिक्षण देणारी ही कंपनी होती.

कर्जाची रक्कम पगारावर खर्च
■ सेंट्रल बँकेने केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये धक्कादायक माहिती बँकेच्या हाती आली. कंपनीला ज्या कारणांसाठी कर्ज दिले होते, त्याऐवजी कंपनीने कर्जापोटी प्राप्त पैसे मुख्य कंपनीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरल्याचे दिसून आले.
■ कंपनीच्या महसुलापैकी ६० टक्के रक्कम कर्मचायांच्या पगारावर खर्च केल्याचे कंपनीने ताळेबंदात नमूद केले होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात नोंदी दिसून आल्या नाहीत.
■ डी. एस. के. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लि. कंपनीने सेन्ट्रल बँकेकडून विस्तारासाठी १०८ कोटी ८४ लाख रुपयांचे कर्ज २००८ मध्ये घेतले होते. मात्र, या कर्जाची परतफेड थकली होती.
व्हेंडर कंपन्यांचा पत्ता कुलकर्णीच्या कार्यालयाचा
■ स्टेट बँकेने फोरेन्सिक ऑडिट केले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार त्यांनी व्हेंडर कंपन्यांसोबत केल्याचे दाखविले.
■ मात्र, ज्या कंपन्यांना त्यांनी हे पैसे दिल्याचा दावा केला, त्या कंपन्यांचा पत्ता हा डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीच्याच ठिकाणाचा आहे.
■ या व्यवहाराचा या व्हेंडर कंपन्यांच्या वार्षिक ताळेबंदात कोणताही उल्लेख नसल्याचेही या ऑडिटमध्ये दिसून आले.

Web Title: 590 crores fraud from DSK State Central and other banks cbi registered case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.