ब्रिटनहून मुंबईत ५९१ प्रवासी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:05 AM2020-12-23T04:05:22+5:302020-12-23T04:05:22+5:30
लक्षणे आढळली नाहीत : खबरदारी म्हणून केले हॉटेलमध्ये क्वारंटाईन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ...
लक्षणे आढळली नाहीत : खबरदारी म्हणून केले हॉटेलमध्ये क्वारंटाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्यामुळे सोमवारपासून मुंबईत येणाऱ्या परदेशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानंतर आतापर्यंत पाचपैकी तीन विमाने ब्रिटन येथून मुंबईत दाखल झाली आहेत. या तीन विमानांतून एकूण ५९१ प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले. यापैकी अद्याप काेणाला लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र खबरदारी म्हणून प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाच दिवसांनंतर त्यांची चाचणी करण्यात येईल.
परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी महापालिकेने पंचतारांकित व फोर स्टार हॉटेलमध्ये दोन हजार खोल्या राखीव ठेवल्या आहेत. सोमवार रात्रीपासून तीन विमाने मुंबईत आली आहेत. या प्रवाशांचे तापमान व अन्य तपासणी करून त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.
* अन्य राज्यातील प्रवाशांची रवानगी
ब्रिटनमधून येणारे २३६ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील असल्याने त्यांनी आपल्या राज्यात पाठविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रवाशांना मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले असून, अन्य राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येणार आहे. याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना कळविण्यात आले आहे. त्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात क्वारंटाईन करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
* विमानांनी आलेले प्रवासी
ब्रिटन येथून तीन विमानांनी ५९० प्रवासी मुंबईत आले आहेत. त्यापैकी १८७ मुंबईतील, १६७ महाराष्ट्र राज्याच्या अन्य भागांतील तर २३६ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील आहेत.
* AI - १३० या विमानाने २५० प्रवासी मुंबईत आले. ६३ मुंबई, ७५ महाराष्ट्र, ११२ राज्याबाहेरील आहेत.
* VS - ३५४ या विमानाने ११५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ५२ मुंबई, ३० महाराष्ट्र, ३३ महाराष्ट्राबाहेरील आहेत.
* BA - १३९ या विमानाने २२५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ७२ मुंबईमधील, ६२ महाराष्ट्रातील तर ९१ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील आहेत.