मुंबई पालिकेत जमा झाले ५९३ किलो प्लास्टीक, १३ लाख ४० हजारांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 11:59 AM2023-08-26T11:59:38+5:302023-08-26T12:00:23+5:30
पालिकेच्या पथकाकडून कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत पाच दिवसांत ५९३ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तर १३ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिसांच्या सहकार्याने पालिकेने ही मोहीम सुरू केली असून, त्यासाठी खास पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने २१ ते २५ ऑगस्ट या कालावधीत शहर व उपनगरात ६ हजार १८ ठिकाणी कारवाई केली. यात दुकानदार आणि अन्य आस्थापनांचा समावेश आहे. प्लास्टिकचा साठा केल्याबद्दल २६८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ जुलै २०२२ ते २ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ५ हजार ९८० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत १ लाख ८७ हजार ७९१ ठिकाणी पालिकेच्या पथकाने छापेमारी करून पिशव्यांचा साठा जप्त केला आहे. तर ९६ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
बुधवारी केलेल्या कारवाईत सर्वांत जास्त प्लास्टिक एम-पश्चिम आणि एफ-दक्षिण या विभागातून जप्त करण्यात आले. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.
- - शुक्रवारी दिवसभरात १०७.६५ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. तर दोन लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आणि ५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वाधिक २५ हजार रुपयांचा दंड ई- विभाग भायखळा येथील कारवाईत आकारला गेला.
या विभागात सापडल्या नाहीत पिशव्या
बंदी घालूनही प्लास्टिकचा सर्रास वापर होताना आढळून येत आहे. अनेक विक्रेत्यांकडेही पिशव्या दिसून येतात. मात्र, पालिकेच्या पथकाने बुधवारी केलेल्या कारवाईत तीन विभागांत एकही प्लास्टिकची पिशवी सापडली नाही. एम-पूर्व गोवंडी, डी-विभाग ग्रँटरोड, एच-पश्चिम वांद्रे आणि घाटकोपर या भागात पिशव्या सापडल्या नाहीत.