5 जी आणि 'हांजी हांजी'! शिवसेनेचा मोदींवर निशाणा अन् मुख्यमंत्री शिंदेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 08:59 AM2022-10-04T08:59:44+5:302022-10-04T09:01:40+5:30
मुख्यमंत्र्यांनी पनवेलच्या शाळेत विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना ५ जीचे महत्त्व सांगितले
मुंबई - भारतात ५ जी सेवेला सुरुवात झाली आहे. दिल्लीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती मैदानावर ५ जी सेवेचा प्रारंभ इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये केला. येथूनच पंतप्रधान मोदी यांनी देशभरात ५ जी सेवेशी जोडलेल्या ३० शाळांसोबत एकत्रित संवाद साधला. महाराष्ट्रात पनवेलमधील पोदी शाळेत सकाळी दहा वाजता उपस्थित राहून मुख्यमंत्री शिंदे ऑनलाईन पंतप्रधानांशी जोडले गेले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले. शिवसेनेनं देशातील या ५ जी सेवेचे आणि गतीमानतेचे स्वागत केले आहे. मात्र, ५ जी चे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला तर मुख्यमंत्री शिंदेंना मिंधे म्हणत टोलाही लगावला.
मुख्यमंत्र्यांनी पनवेलच्या शाळेत विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना ५ जीचे महत्त्व सांगितले. क्रांतिकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅँकिंग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे म्हटले. या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून, विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा. गेम आणि चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. यावरुन, मुख्यमंत्र्यांना शिवसेनेनेला टोला लगावला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिंदेंचा मिंधे असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, ५ जी चं स्वागत पण राजकारणात हाँजी हाँजी झालंय ते दुर्दैवी असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
आपल्या देशात '5 जी' आले हे उत्तम, पण '5 जी ' पेक्षा देशाच्या राजकारणाचे ' हांजी हांजी ' नेटवर्क गतिमान झाल्याचे दुष्परिणाम आपला देश भोगत आहे . आम्ही '5 जी ' चे स्वागत करतो . इंटरनेटचा वेग वाढवून ' हांजी हांजी ' चा वेग कमी केला तर 2029 पर्यंत देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था नक्कीच बनेल . '5 जी ' चे पंख या स्वप्नास बळ देतील, असे म्हणत एकप्रकारे मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे.
मोदींच्या प्रतिमेला तडा जाणारे
मोदी यांना वेगाचे वेड आहे. ते देशाला गतिमान करू इच्छितात. त्यांनी जपानच्या मदतीने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचे मनावर घेतले व आसपासच्या भागातील जमिनी या प्रकल्पासाठी ताब्यात घेतल्या. म्हणजे या विकासात शेतकरी व जमीनमालकांचेही योगदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. देशात सुरू झालेली '5 जी' सेवा विकासात भर घालणारीच आहे, मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत देशाच्या राजकारणाचे 'हांजी हांजी'करण '5 जी'च्या वेगाने आधीच सुरू झाले व ते पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेस तडा देणारे आहे. घराणेशाही, वंशवादाच्या राजकारणात 'हांजी हांजी' चालते, पण लोकशाहीत '5 जी'वर 'हांजी'ने मात करू नये इतकीच अपेक्षा असते.
५ जी युगातील हे विदारक चित्र
मोदी यांनी देशात '5 जी' युग सुरू केले, पण देशाच्या अनेक भागांत आज इस्पितळे नाहीत. शिक्षणाची बोंब आहे. महाराष्ट्रात, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्हय़ात आदिवासींना 'झोळी' व 'डोली'च्या माध्यमांतून आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवावे लागते. गरोदर स्त्रिया त्या झोळीतच अनेकदा बाळंत होतात व त्यात अर्भकांचे मृत्यू होतात. '5 जी' युगातील हे चित्र विदारक आहे. गरीबांना फुकट धान्य दिले जाते, पण हे काही स्वावलंबी भारताचे चित्र नाही