वंदे भारत अभियानांतर्गत ६ कोटी ७५ लाख नागरिक परतले मायोदेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:06 AM2021-03-22T04:06:07+5:302021-03-22T04:06:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाकाळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत आतापर्यंत ६ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत आतापर्यंत ६ कोटी ७५ लाख नागरिक मायदेशी परतले आहेत. जगातली ही सर्वात मोठी ‘घरवापसी’ मोहीम ठरली आहे.
कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी जगभरात सर्वप्रथम विमान वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे परदेशांत अडकलेल्या नागरिकांचे मोठे हाल झाले. त्यापैकी काही जणांनी खिशात पैसे असेपर्यंत दिवस कसेबसे ढकलले. पण, त्यानंतर अन्नान् दशा झाली. मायदेशी येण्याचे सर्व पर्याय बंद झाल्याने आत्महत्या करण्याशिवाय अन्य मार्ग नव्हता. ही स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी धडपड सुरू केली. त्यासाठी वंदे भारत ही मोहीम आखण्यात आली.
या मोहिमेंतर्गत जगाच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला परत आणण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. त्यासाठी भारतीय दुतावासाने महत्त्वाची भूमिका बजावली. ७ मे २०२० रोजी ही मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत ७ कोटी ७५ लाख नागरिकांना मायदेशी आणण्यात यश आले आहे. हवाई वाहतुकीच्या जोडीला नौदलाचीही मदत या कार्यात घेण्यात आली, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी रविवारी ट्विटरद्वारे दिली.
........................
दिवसभरात ९३४ प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल
वंदे भारत अभियानांतर्गत शनिवारी विविध देशांतून ८ हजार ५८७ प्रवासी भारतात परतले. त्यापैकी ९३४ प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मुंबई) दाखल झाले. त्यात न्यूयॉर्कहून आलेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २१८ इतकी आहे. त्याखालोखाल लंडनहून २११, मस्कत १५६, दुबई १४५, दम्माम १२४, तर जेद्दाहहून ८० प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.
.......................
मुंबईत विलगीकरणाचा नियम काय?
- इंग्लंड, युरोपीय देश, मध्य पूर्व आशिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील येथून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरण आणि सात दिवस गृहविलगीकरणात राहाणे बंधनकारक आहे. मात्र, काही प्रवाशांना यात सूटही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- ६५ वर्षांवरील व्यक्ती, प्रसुतीकाळ जवळ आलेल्या गर्भवती महिला, पाच वर्षे वयाखालील मुलांचे पालक, गंभीर आजारग्रस्त व तत्काळ उपचारांची गरज असलेले रुग्ण, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्ती, तसेच अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा यात समावेश आहे.
- या प्रवाशांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कागदपत्रे विमानतळावर सादर करावी लागतील.