मनोज गडनीस, मुंबई : गेल्या ११ ते १४ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १२ विविध प्रकरणात एकूण १० किलो २ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६ कोटी ३ लाख रुपये इतकी आहे.
मुंबई विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. तस्करीच्या माध्यमातून सोने मुंबईत येत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. जप्त केलेल्या सोन्यामध्ये सोन्याची पेस्ट, सोन्याचे बार, दागिने अशा सोन्याचा समावेश आहे. या सोने तस्करी प्रकरणी एकूण तीन भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे सोने प्रामुख्याने दुबई, शारजा आणि अबुधाबी येथून भारतामध्ये आले आहे. यापैकी एकूण तीन प्रकरणात सोने शरीरात लपविल्याचे आढळून आले. या तीन प्रवाशांच्या शरीरातून एकूण १६२९ ग्रॅम सोने बाहेर काढण्यात आले आहे.