६ कोटींचे कोकेन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:57 AM2019-01-14T05:57:38+5:302019-01-14T05:57:48+5:30
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, अमली पदार्थ विरोधी विभागाची कारवाई
मुंबई : अंधेरीतील एका नामांकित शाळेबाहेर ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोन नायजेरीयन नागरिकांना जेरबंद करत, पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी)आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कुरिअर किंवा एका प्रवाशाच्या मदतीने हे कोकेन मुंबईत आणल्याची शक्यता असून, या प्रकरणी दोन नायजेरीयनांना शनिवारी रात्री अटक करत त्यांच्याजवळून ६ कोटी ३ लाख रुपये किमतीचे एक किलो कोकेन जप्त केले आहे.
आंबोली परिसरातील एका नामांकित शाळेबाहेरील सीझर रोड जंक्शनवर दोन विदेशी तस्कर ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एएनसीच्या वांद्रे कक्षाला मिळाली होती. तिच्या आधारे पथकाने सापळा रचून डॅनियल ईझेके (३८) आणि जॉन फ्रान्सीस (३५) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांच्याही अंगझडतीमध्ये डॅनियलजवळ ५०५ ग्रॅम, तर जॉन याच्याजवळ ५०० ग्रॅम कोकेन सापडले. या कोकेनची आंतराराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ६ कोटी ३ लाख रुपये असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही आरोपींजवळील मोबाइल आणि पासपोर्ट ताब्यात घेतले असून, दोघांच्याही संपर्कात असलेल्यांचा शोध सुरू केला आहे.
हे कोकेन विदेशातून हवाई मार्गाने मुंबईत आणण्यात आले होते. डॅनियल आणि जॉन हे दोघे ते अन्य तस्करांना देणार असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले असून, यामागे असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी दोघांकडेही कसून चौकशी सुरू करण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.
हवाईमार्गे आणले मुंबईत
हे कोकेन विदेशातून हवाई मार्गाने मुंबईत आणण्यात आले होते. डॅनियल आणि जॉन हे ंदोघे ते अन्य तस्करांना देणार असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.