आफ्रिकन तरुणाकडून ६ कोटींचे कोकेन जप्त, एएनसीच्या वांद्रे पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 11:29 PM2019-07-16T23:29:46+5:302019-07-16T23:30:43+5:30
आंतरराष्ट्रीय तस्करी करणाऱ्या टोळीचा तो साथीदार असून दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक या देशातून हे कोकेन दिल्लीतून मुंबईत आणण्यात आले होते, असे, विभागाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खार (प) येथील दुरध्वनी केंद्राजवळ एका आफ्रिकन तरुणाला अटक करुन सहा कोटी १२ लाख रुपये किंमतीचे तब्बल एक किलो २० ग्रॅम कोकेन जप्त केले.बोनाव्हेचूर एनझुवेचुक्कु एनबुड (३५,रा. कौपरखैरणे, नवी मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
आंतरराष्ट्रीय तस्करी करणाऱ्या टोळीचा तो साथीदार असून दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक या देशातून हे कोकेन दिल्लीतून मुंबईत आणण्यात आले होते, असे, विभागाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. एएनसीच्या वांद्रे पथकातील वरिष्ठ निरीक्षक अनिल वाढवणे, सहाय्यक निरीक्षक विशाल खैरे यांना एक परदेशी मोठ्या प्रमाणात कोकेन घेवून खार येथील न्यू लिंक रोडवरील दुरध्वनी केंद्राजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी रात्री परिसरात पाळत ठेवण्यात आली होती. संशयास्पदरित्या अवस्थेत फिरणाºयाला पकडून झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल १ किलो २० ग्रॅम कोकेन मिळाले. त्याच्याकडे केलेल्या तपासात मोझांबिक देशातून कोकेन दिल्लीत आणण्यात आले होते. तेथून एनबुडने ते मुंबईत विक्री करण्यासाठी आणले होते. त्याच्या टोळीतील अन्य साथीदाराची माहिती घेण्यात येत असल्याचे उपायुक्त लांडे यांनी सांगितले.
वांद्रे पथकाने यापूर्वी २४ मे रोजी डेव्हिड आल तबुलाई या केनियनला अटक करुन ३ कोटी रुपये किमंतीचे ५१० ग्रॅम कोकेन तर जानेवारीमध्ये जॉन फ्रॉन्सिस व इजिके यांना अटक करुन ६ कोटी ३ लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त केले. या पथकाने गेल्या काही महिन्यात तब्बल १५ कोटी २२ लाख रुपये किंमतीचे २ किलो ५३५ ग्रॅम कोकेन जप्त केले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.