Join us

राज्यातील ६ शिक्षणसंस्था जगातील गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 5:32 AM

सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१-२२

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१-२२ ही क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये राज्यातील सहा शिक्षण संस्थांचा या क्रमवारीत समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबईतील आयआयटी मुंबई, आयसीटी, टीआयएफआर या संस्थांचा क्रमवारीत समावेश आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विविध निकषांवर मूल्यमापन करून जगभरातील या शिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१-२२ च्या क्रमवारीत जागतिक पातळीवरील क्रमवारीत पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे हार्वर्ड विद्यापीठ, मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ या संस्था आहेत. देशातील ६८ शिक्षण संस्थांचा या यादीत समावेश आहे. क्रमवारीतील शिक्षण संस्थांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांना मिळालेले रोजगार, संशोधनातील कामगिरी, प्राध्यापक अशा निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. देशातील शिक्षण संस्थांमध्ये आयआयएम अहमदाबाद या यादीत पहिल्या स्थानी, बंगळुरूचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स दुसऱ्या स्थानी तर दिल्ली विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) चौथ्या स्थानी आहे. आयआयटी मुंबई, होमी भाभाचाही समावेश 

जागतिक पातळीवरील दोन हजार संस्थांमध्ये मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ५४३ व्या स्थानी आहे. त्यानंतर आयआयटी मुंबई (५६७), पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) १०२४ व्या स्थानी तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १३८९ व्या, मुंबईतील होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्युट १६६६ व्या आणि मुंबईचीच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी १८५८ व्या स्थानी आहे. राज्य शासनाच्या अखत्यारितील राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांपैकी केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाच या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. तसेच राज्यातील खासगी विद्यापीठांपैकी एकाही विद्यापीठाला या क्रमवारीत स्थान मिळवता आलेले नाही.

‘टीआयएफआर’ पहिल्या क्रमांकावरमुंबईतील शिक्षण संस्थांमध्ये टीआयएफआरने या क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले आहे तर त्यानंतर आयआयटी मुंबईने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. त्यानंतर होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने स्थान मिळविले आहे.

टॅग्स :मुंबईविद्यापीठटाटा