ऐतिहासिकपटांवर सव्वाशे कोटी; १५ चित्रपटांवर काम सुरू, शिवकालीन काळ रुपेरी पडद्यावर

By संजय घावरे | Published: June 11, 2023 12:24 PM2023-06-11T12:24:56+5:302023-06-11T12:25:56+5:30

मराठी सिनेसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आहे.

6 hundred crore on historical films work on 15 films is underway | ऐतिहासिकपटांवर सव्वाशे कोटी; १५ चित्रपटांवर काम सुरू, शिवकालीन काळ रुपेरी पडद्यावर

ऐतिहासिकपटांवर सव्वाशे कोटी; १५ चित्रपटांवर काम सुरू, शिवकालीन काळ रुपेरी पडद्यावर

googlenewsNext

संजय घावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आहे. इतिहासातील विविध विषयांवर आधारलेले एका मागोमाग एक विविध चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहेत. बॅाक्स ऑफिसवरही हे चित्रपट चांगली कमाई करत असल्याने मराठी निर्मात्यांनी ऐतिहासिक चित्रपटांवर जवळपास सव्वाशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सध्या १५ ऐतिहासिक चित्रपट निर्मिती प्रक्रियेत असून, आणखी काहींची योजना आखली जात आहे.

‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड;, ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘हंबीरराव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’, ‘हिरकणी’, ‘हर हर महादेव’, ‘रावरंभा’, ‘बलोच’ रिलीज झाले आहेत. आगामी चित्रपटांमध्ये दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचा ‘सुभेदार’, ‘छावा - दि ग्रेट वॉरियर’, ‘आग्य्राहून सुटका’ या तीन चित्रपटांसोबत महेश मांजरेकरांचा ‘वीर दौडले सात’, रवी जाधवचा ‘बाल शिवाजी’, विजय राणेंचा ‘सिंहासनाधिश्वर’, अजय आरेकरचा ‘रामशेज’ व ‘मुरारबाजी’, राहुल जाधवचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’, स्नेहल तरडेचा ‘फुलवंती’, डॅा. अमोल कोल्हेंचे शिवप्रताप वाघनख व शिवप्रताप वचपा तसेच आणखी तीन चित्रपटांचे काम सुरू आहे. भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित भव्य-दिव्य चित्रपट बनविण्याचे स्वप्न असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लोकमत’च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात सांगितले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांनीही महाराजांवरील चित्रपटांची घोषणा केली आहे. 

ऐतिहासिक चित्रपटांमध्ये जुना काळ उभारण्यासाठी बजेटमधील बराचसा भाग खर्च होतो. व्हिज्युअल इफेक्ट्स व काॅम्प्युटर ग्राफिक्सद्वारे शक्य होत असले तरी त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. वेशभूषा, हत्ती, घोडे, शस्त्रे या महत्त्वपूर्ण गोष्टींवरील खर्च टाळता येत नाही. एका ज्युनियर आर्टिस्टवर दिवसाला १५०० ते २०००  रुपये खर्च ५०० ज्युनियर आर्टिस्टसोबत एक दिवस शूटचे बजेट दिवसाला ८ ते १० लाख जितके दिवस शूट तितके बजेट वाढते.

ऐतिहासिक चित्रपटासाठी अधिक बजेट ठेवावे लागते

ऐतिहासिक चित्रपटासाठी मुख्य कलाकारांना तालीम आणि प्रशिक्षणासाठी भरपूर वेळ द्यावा लागत असल्याने कित्येकदा त्यांच्या मानधनातही वाढ होते. इतर कलाकार-तंत्रज्ञांवरील खर्च वेगळाच असतो. शूटिंग पूर्ण झाल्यावर प्री-प्रोडक्शन, पब्लिसिटी, प्रमोशनल ॲक्टिव्हीटीज, डिस्ट्रीब्युशन यासाठी दीड ते दोन कोटींचे बजेट असते. त्यामुळे एका ऐतिहासिक चित्रपटासाठी कथेच्या गरजेनुसार पाच ते सात कोटींहून अधिक बजेट ठेवावे लागते.

मराठीसह हिंदीत बनणाऱ्या ‘वीर दौडले सात’चे बजेट ५० कोटींच्याही पुढे जाईल. सात वर्षांपासून हा चित्रपट बनविण्याच्या प्रयत्नान होतो, पण बजेटमुळे थांबावे लागले. कुठेही तडजोड करायची नव्हती. आज बरेच दिग्दर्शक वेगवेगळे विषय हाताळत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणत असल्याचा आनंद आहे. बजेटच्या जोडीला खूप मेहनत घ्यावी लागते. माझ्यासह सर्वांनीच चांगले चित्रपट बनवावेत आणि सर्वच चित्रपट चालावेत ही इच्छा आहे. - महेश मांजरेकर, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते

 

Web Title: 6 hundred crore on historical films work on 15 films is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.