Join us

पालिकेकडून नव्याने आॅडिट : फेरतपासणीत सहा नवीन पूल ठरले धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 7:24 AM

किरकोळ दुरुस्ती सुचवलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाने सर्व पुलांची फेरतपासणी केली. यामध्ये उपनगरातील आणखी सहा पूल धोकादायक असल्याचे उजेडात आले आहे.

मुंबई : किरकोळ दुरुस्ती सुचवलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाने सर्व पुलांची फेरतपासणी केली. यामध्ये उपनगरातील आणखी सहा पूल धोकादायक असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे आता उपनगरातील एकूण १७ पूल अतिधोकादायक ठरल्याने पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.हिमालय पादचारी पूल १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कोसळून या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाला, तर ३० प्रवासी जखमी झाले. स्ट्रक्चरल आॅडिटरने किरकोळ दुरुस्ती सुचविलेला पूल पडल्यामुळे या दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. या प्रकरणी स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज देसाईला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पूर्व व पश्चिम उपनगरातील सर्व पुलांचे पुन्हा एकदा आॅडिट करण्यात आले.उपनगरातील ११ पूल अतिधोकादायक असल्याचे पहिल्या आॅडिटमध्ये दिसून आले होते. यामध्ये सहा पश्चिम उपनगरात तर पाच पूर्व उपनगरातील पूल आहेत. शहरातील पुलांच्या आॅडिटबाबत साशंकता निर्माण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील दीडशे आणि पूर्व उपनगरातील ६४ पुलांचे गेल्या महिन्याभरात पुन्हा आॅडिट करण्यात आले. यात आणखी सहा पूल दुरुस्तीपलीकडे गेल्याचे दिसून आले, असे सूत्रांकडून समजते.तर, प्रशासनाने पादचारी, प्रवाशांच्या जिवाशी खेळू नये, लवकरात लवकर पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, असा सूर सामान्या नागरिकांमध्ये आहे.पहिल्या वेळेस २५३ पुलांची पाहणीपहिल्या वेळेस एकूण २५३ पुलांची पाहणी करून आॅडिट करण्यात आले होते. यात शहरातील ३९, पश्चिम उपनगरातील १५०, पूर्व उपनगरातील ६४ पुलांचे आॅडिट करण्यात आले. या वेळी अतिधोकादायक १४ पूल आढळले. यातील तीन शहरातील तर ११ उपनगरातील आहेत. ६१ पुलांची मोठी दुरुस्ती करणे गरजेचे असून १०७ पुलांची किरकोळ दुरुस्ती सुचवण्यात आली.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका