मुंबईतल्या ६ पोलीस ठाण्यांचा लवकरच होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:45 AM2019-01-08T01:45:39+5:302019-01-08T01:46:18+5:30

२५ कोटी रुपयांचा निधी : दोन वर्षांत १८ पोलीस ठाणी कात टाकणार

6 police stations in Mumbai will soon be transformed | मुंबईतल्या ६ पोलीस ठाण्यांचा लवकरच होणार कायापालट

मुंबईतल्या ६ पोलीस ठाण्यांचा लवकरच होणार कायापालट

Next

मुंबई : विलेपार्ले पोलीस ठाण्यासारखेच मुंबईतल्या आणखी सहा पोलीस ठाण्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. यामध्ये गोवंडी, विनोबा भावेनगर, वाकोला, गोरेगाव, मालाड, मेघवाडी या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर येत्या दोन वर्षांत मुंबईत १८ पोलीस ठाण्यांचे रूपडे बदलण्याचा प्रयत्न शासकीय स्तरावर सुरू आहे.

विलेपार्ले येथे जीव्हीके या कंपनीच्या सहकार्याने मुंबईतील पहिले अत्याधुनिक पोलीस ठाणे उभारण्यात आले. अवघ्या १० महिन्यांच्या कालावधीत ही ४ मजली इमारत उभारण्यात आली. साडेबारा हजार चौरस फुटांमध्ये असलेल्या या इमारतीत पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. २० पोलीस वाहने उभी राहतील एवढी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसा प्रकाश आणि पंख्याचा वापर न करता पर्यावरणपूरक मोकळे आणि हवेशीर वातावरण राहावे अशी इमारतीची रचना करण्यात आली आहे. त्यात पोलिसांसाठी अद्ययावत व्यायामशाळा, जेवणासाठी उपाहारगृह, संपूर्ण इमारतीत वायफाय सुविधा, अंमलदार, अधिकाऱ्यांना आराम करण्यासाठी ४ स्वतंत्र खोल्या, तसेच अल्पवयीन मुलींच्या तक्रारींसाठी स्वतंत्र पॉक्सो सेलही यात उभारण्यात आला आहे. तसेच पोलिसांसाठी ४० संगणक ठेवण्यात आले आहेत. तपासासाठी स्वतंत्र खोल्यांचीदेखील यात व्यवस्था करण्यात आली आहे. याच प्रकारे मुंबईतील संवेदनशील मानल्या जाणाºया गोवंडी, विनोबा भावेनगर, वाकोला, गोरेगाव, मालाड, मेघवाडी पोलीस स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत या पोलीस ठाण्यांच्या इमारती उभ्या राहतील.

विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या उद्घाटनादरम्यान जिल्हा नियोजन समितीमधून २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यानुसार, हा निधी देण्यात आल्याने पहिल्या टप्प्यात या पोलीस ठाण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या उभारणीसाठी साडेसहा कोटींचा खर्च आला होता. येत्या दोन वर्षांत मुंबईतील १८ पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक बनविण्याचा मानस तावडे यांनी व्यक्त केला. त्याची यादीही त्यांनी सादर केली आहे. टप्प्या टप्प्याने याचे काम होणार आहे़ येत्या दोन वर्षांत नवीन पोलीस मुंबईकरांना दिसतील़ अनेक पोलीस ठाणी भाडेतत्त्वावर मुंबईतील अनेक पोलीस ठाणी ही भाड्याने घेतलेल्या जागेवर उभी आहेत. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांसाठी राखीव असलेल्या जागांचा आढावा घेत, त्यानुसार त्यावर सुसज्ज असे पोलीस ठाणे उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

विनोबा भावेनगर पोलीस ठाणे
कुर्ला पश्चिमेकडील एका नाल्यावर हे पोलीस ठाणे आहे. त्यामुळे मच्छर, दुर्गंधी, अस्वच्छ वातावरणात काम करताना पोलिसांना त्रास होतो. या पोलीस ठाण्याअंतर्गत साडेचार लाख लोकवस्ती आहे. मसरानी लेन, बैलबाजारसारख्या अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांचा येथे समावेश आहे.

गोरेगाव
गोरेगाव पूर्वेकडील एस.व्ही. रोडवर गोरेगाव पोलीस ठाणे आहे. अतिशय दाटीवाटीने असलेल्या जागेत या पोलीस ठाण्याचा कारभार चालतो. सिद्धार्थ रुग्णालय याच पोलीस ठाण्याअंतर्गत आहे. सहा लाख नागरिकांची जबाबदारी या पोलीस ठाण्याच्या खांद्यावर आहे.
मालाड
सव्वाचार लाख लोकसंख्येची जबाबदारी असलेल्या मालाड पोलीस ठाण्याची अवस्थाही तशी बिकटच आहे. चौक्सी आणि नेमानी ही दोन शासकीय रुग्णालये याच पोलीस ठाण्याअंतर्गत येतात. त्यामुळे येथील सुरक्षेच्या जबाबदारीचे आव्हानही पोलिसांसमोर आहे.

गोवंडी
देवनारच्या व्ही.एन. पुरव मार्गावर गोवंडी पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत जवळपास पावणेचार लाख मिश्र लोकवस्तीचा समावेश आहे. संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी ते एक आहे.
वाकोला
सांताक्रुझ पूर्वेकडील आनंद संघम या पोलीस वसाहतीत वाकोला पोलीस ठाण्याची इमारत आहे. जवळपास ५ लाख ८० हजार लोकसंख्या त्यांच्या अंतर्गत आहे.
मेघवाडी
जोगेश्वरी पूर्वेकडील आयकर वसाहतीत मेघवाडी पोलीस ठाणे आहे. छोट्याशा जागेतच पोलिसांना कामकाज सांभाळावे लागते. अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची जबाबदारी या पोलीस ठाण्याअंतर्गत आहे.

Web Title: 6 police stations in Mumbai will soon be transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई