मुंबईत २४ दिवसांत ६ हजार ३७२ लहानग्यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:05 AM2021-04-05T04:05:52+5:302021-04-05T04:05:52+5:30

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात लाॅकडाऊनच्या शिथिलतेनंतर सार्वजनिक स्थळी वाढलेला वावर ...

6 thousand 372 children contracted corona in 24 days in Mumbai | मुंबईत २४ दिवसांत ६ हजार ३७२ लहानग्यांना कोरोनाची लागण

मुंबईत २४ दिवसांत ६ हजार ३७२ लहानग्यांना कोरोनाची लागण

Next

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात लाॅकडाऊनच्या शिथिलतेनंतर सार्वजनिक स्थळी वाढलेला वावर लक्षात घेता लहानग्यांना होणारा कोरोनाचा संसर्गही वाढला आहे. मात्र लहानग्यांमध्ये तुलनेने संसर्गाची तीव्रता कमी असून, मृत्युदरही अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. मागील २४ दिवसांत ११ मार्च ते ३ एप्रिल रोजी नवजात ते नऊ वर्षांपर्यंतच्या ६ हजार ३७२ लहानग्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहानग्यांचीही विशेष काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. ११ मार्चपर्यंत नवजात बालक ते ९ वयोगटांतील ५ हजार ५९ आणि १० ते १९ वयोगटातील १३ हजार १३८, अशी एकूण १८ हजार १९७ मुले कोरोना पॉझिटिव्ह आली होती. ३ एप्रिलपर्यंत नवजात बालक ते ९ वयोगटांतील ७ हजार २० आणि १० ते १९ वयोगटांतील १७ हजार ५४९, अशी एकूण २४ हजार ५६९ मुले कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. गेल्या २४ दिवसांत १९ वर्षांखालील ६ हजार ३७२ लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. गेल्या २४ दिवसांत ० ते ९ वयोगटातील ४ हजार ४११ मुले पॉझिटिव्ह आली आहेत. ११ मार्च २०२० ते ११ मार्च २०२१ या वर्षभराच्या कालावधीत नवजात बालक ते ९ वयोगटातील १७ आणि १० ते १९ वयोगटातील ३१, अशा एकूण ४८ मुलांचा मृत्यू झाला होता. यावर्षी ३ एप्रिलपर्यंत नवजात बालक ते ९ वयोगटातील १७ आणि १० ते १९ वयोगटातील ३२, अशा एकूण ४९ मुलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ही आकडेवारी पाहता गेल्या २४ दिवसांत एकाच मुलाचा मृत्यू झाला आहे. यामुळे या वयोगटातील मृत्यूची संख्या नगण्य असल्याचे दिसते.

गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत राज्यात ६ हजार ७०४ लहान मुले बाधित झाली होती. एकूण रुग्णांमध्ये बाधित होण्याचे प्रमाण हे ३.१४ होते. आता राज्यात कोरोनाची लाट आली आहे. यात दहा वर्षांच्या आतील लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता बाधित होण्याचे प्रमाण हे ३.६१ वर पोचले आहे, यात नवजात बालकांचाही समावेश आहे.

राज्यातही ९१ हजारांहून अधिक बालकांना संसर्ग

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनाच्या अहवालानुसार, राज्यात नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ९१ हजार ५४ लहानग्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांच्या एकूण संख्येत हे प्रमाण ३.१२ टक्के आहे, तर ११ ते २० वयोगटातील १ लाख ९३ हजार २५३ मुला-मुलींना कोरोना झाला आहे, एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ६.६२ टक्के इतके आहे.

पालकांनी अधिक जबाबदारीने वागले पाहिजे

- डॉ. मयुरेश जैन, बालरोगतज्ज्ञ

लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढत असून, ते चिंताजनक आहे. घरातील मोठ्यांमुळे किंवा एकत्र खेळण्यामुळे लहान मुलांना संसर्ग होत आहे. पालकांनी याकडे लक्ष देऊन आणखी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. आता यावर लसीकरणाप्रमाणे वेगळ्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. उद्याने तसेच गृहसंस्थेच्या मोकळ्या आवारात मुलांची गर्दी जमताना दिसू लागली आहे. लहान मुले अनेक वेळा एकत्र खेळतात. यामुळे त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. शिवाय कोरोना विषाणूनेही स्वरूप बदलल्याचा फटका लहान मुलांना बसू लागला आहे, त्यामुळे याविषयी पालकांनी अधिक जबाबदारीने वागले पाहिजे.

Web Title: 6 thousand 372 children contracted corona in 24 days in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.