पाच वर्षांत ६ हजार ३८८ क्षय रुग्णांचा मृत्यू; शिवडी क्षय रुग्णालयातील धक्कादायक आकडेवारी
By स्नेहा मोरे | Published: August 29, 2022 08:07 PM2022-08-29T20:07:06+5:302022-08-29T20:08:17+5:30
जगभरातील एकूण क्षयरोग बाधितांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात आहेत.
मुंबई -मुंबईतील शिवडी क्षय रुग्णालयात मागील पाच वर्षांत सहा हजारांहून अधिक क्षय रुग्णांचा बळी गेला आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत सर्वाधिक मृत्यूंची नोंद २०१७ साली झाली आहे, या २०१७-१८ दरम्यान रुग्णालयात १ हजार ६०६ क्षय रुग्णांचा बळी गेला आहे. तसेच, कोविड दरम्यान क्षयाच्या निदानात खंड पडल्याने या काळात रुग्णनिदानही घटल्याची बाब समोर आली होती.
जगभरातील एकूण क्षयरोग बाधितांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात आहेत. जेव्हा देशातील रुग्ण त्यांना देत असलेल्या उपचारांची संपूर्ण प्रक्रिया जबाबदारीने पूर्ण करतील आणि या रोगाचा प्रसार थांबविण्यास मदत करतील तेव्हाच भारतातून क्षयरोगाचे संपूर्णपणे निर्मूलन होऊ शकेल. क्षयरोग हा सूक्ष्मजंतू ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’मुळे होतो. जेव्हा फुप्फुसाचा एखादा क्षयरुग्ण खोकतो किंवा शिंकतो, या वेळी क्षयरुग्णाच्या तोंडातून सूक्ष्म थेंब बाहेर पडतात. या सूक्ष्म थेंबात क्षयरोगाचे जंतू असतात. हा सूक्ष्म थेंब हवेत बराच वेळ तरंगत असतो. ज्या वेळी निरोगी व्यक्ती ही हवा नाकाद्वारे आत घेतो, त्या वेळी श्वासातून क्षयरोगाचा जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात जातो व त्यास क्षयरोगाचा संसर्ग होतो.
वर्ष क्षयरुग्ण मृत्यू
२०१७-१८ १६०६
२०१८-१९ १४७९
२०१९-२० १३८६
२०२०-२१ ८९३
२०२१-२२ १०२४
एकूण ६३८८
यामुळे उद्भवतो धोका- डॉ. साकेत शर्मा, क्षयरोगतज्ज्ञ
खालावलेली रोगप्रतिकार शक्ती हे क्षयरोग होण्याचे एक सर्वसामान्य कारण समजले जाते, ज्यामुळे क्षयरोग संक्रमण हे क्षयरोगात परिवर्तीत होते. एचआयव्ही, तणाव, मधुमेह, फुफ्फुसांचा आजार असलेले लोक, मद्यपान करणारे लोक, धुम्रपान करणारे लोक ज्यांची एकूणच प्रकृती खालावलेली असते अशा लोकांना क्षयरोग होण्याची अधिक शक्यता असते. या एकंदर प्रतिकारशक्तीकमी असलेल्या टप्प्यावर या गटातील लोकांमध्ये लक्षणे दिसू लागतात. एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे क्षयरोग आणि एचआयव्ही रुग्णांमध्ये सर्वात मोठे संधिसाधू संक्रमण असते ते क्षयरोग जीवाणूचे. जर एखादी व्यक्ती कोणतेही उपचार घेत नसेल तर, तिला क्षयरोग होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
दोन वर्षांत 222 रुग्णांना कोविड, तर 27 जणांचा मृत्यू
कोरोना महामारीच्या दोन वर्षांत रुग्णालयातील 222 रुग्णांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले असून यातील 27जणांचा मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. तर रुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांचाही कोरोना काळात मृत्यू झाल्याची नोंद आहे. याखेरीज, दोन वर्षांत रुग्णालयातील एकूण 108 कर्मचाऱी- डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.