मुंबईत ६ हजार ६४४ कोरोना रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:51 AM2020-04-30T05:51:56+5:302020-04-30T05:52:09+5:30
शहर उपनगरात दिवसभरात ४७५ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या ६,६४४ झाली आहे. तर दिवसभरात २६ मृत्यू झाले असून बळींचा आकडा २७० वर पोहोचला आहे.
मुंबई : राज्यात बुधवारी झालेल्या कोरोना रुग्णांच्या निदानापैकी सर्वाधिक निदान मुंबईत झाले आहे. शहर उपनगरात दिवसभरात ४७५ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या ६,६४४ झाली आहे. तर दिवसभरात २६ मृत्यू झाले असून बळींचा आकडा २७० वर पोहोचला आहे. मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे दिवसभरात १९३ जण तर आतापर्यंत १ हजार ४२७ रुग्ण कोरोना (कोविड-१९) मुक्त झाले आहेत.
शहर उपनगरातील २६ मृत्यूंपैकी १० रुग्णांचे मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील २१ रुग्ण पुरुष तर ५ महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १३ जणांचे वय ६० हून अधिक होते. तर एक रुग्ण ८० वर्षावरील होता. २६ आणि २७ एप्रिल रोजी प्रयोगशाळांमध्ये झालेल्या १७० जणांच्या कोरोना (कोविड) चाचण्यांचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आहे. मुंबईत बुधवारी पालिकेच्या विविध रुग्णालयांत ३७७ संशयित कोरोना रुग्ण दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत ९ हजार ५३२ जण भरती झाले आहेत.
>राज्यात बळींचा आकडा ४३२
राज्यातील बुधवार झालेल्या ३२ मृत्यूंपैकी २५ पुरुष तर ७ महिला आहेत. या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये ५६ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. राज्यात सध्या ७२३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून बुधवारी एकूण ९८११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४०.४३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.