मुंबईत घोड्यावरून पडल्याने सहा वर्षीय मुलीच्या मेंदूला गंभीर इजा, डॉक्टरांनी केलं ब्रेनडेड घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 11:54 AM2017-11-06T11:54:14+5:302017-11-06T12:06:33+5:30
मंत्रालयाच्या बाजूला असणाऱ्या राजीव गांधी उद्यानात घोड्यावरून पडल्याने एक सहा वर्षाच्या मुलीच्या डोक्याला जबर इजा झाली.
मुंबई- मंत्रालयाच्या बाजूला असणाऱ्या राजीव गांधी उद्यानात घोड्यावरून पडल्याने एक सहा वर्षाच्या मुलीच्या डोक्याला जबर इजा झाली. मुलीच्या डोक्याला लागलेला मार गंभीर असून कधीही भरून न येणारा आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. जान्हवी शर्मा असं या मुलीचं नाव असून ती बालवाडीत शिक्षण घेत होती. उद्यानात हॉर्स राइडिंग करत असताना जान्हवी घोड्यावरून पडली. यामध्ये तिच्या मेंदूला जबर दुखापत झाली असून तिला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं आहे.
याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी हॉर्स रायडर सोहम जयस्वाल (30) विरोधात तक्रार दाखल केली असून त्याला अटक करण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी जान्हवी तिच्या आई-वडिलांबरोबर उद्यानात गेली असतान सव्वाचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जान्हवीचे वडील एका खासगी कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता पोलिसांना बॉम्बे हॉस्पिटलमधून फोन आल्यानंतर या घटनेची माहिती मिळाली. 'हॉस्पिटलमध्ये आणल्यावर मुलीला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं. तिला डोक्याच्या आतमधील भागात गंभीर दुखापत झाली होती. तसंच हॉस्पिटलमध्ये आणताना तिच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
जान्हवी घोड्यावरून नेमकी की पडली याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. घटनेच्या वेळी जान्हवीची मोठी बहिण आणि काही नातेवाईक उद्यानाताच होते. दरम्यान, जान्हवी ज्या घोड्यावर बसली होती त्या हॉर्स रायडरला अटक केली असून पुढील चौकशी सध्या सुरू आहे. जान्हवी ही एका खासगी कंपनीचे सीईओ महेंद्र शर्मा यांची मुलगी आहे.
रविवार असल्याने उद्यानात हॉर्स राइडिंगसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असते. पालक आपल्या लहान मुलांना घेऊन हॉर्स राइडिंगसाठी येतात, असं स्थानिकांनी सांगितलं. राजीव गांधी उद्यानाला घोडा गार्डनही म्हंटलं जातं.