Join us

महापालिका शाळांच्या मैदानासाठी ६०:४० चा फॉर्म्युला लाभदायी

By सीमा महांगडे | Updated: December 23, 2024 11:24 IST

५०० शाळांच्या इमारतींभोवती खेळण्यासाठी जागा उपलब्ध

मुंबई: महापालिका शाळांच्या मैदानासाठी ६०:४० च्या फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. जवळपास ५०० शाळांच्या इमारतींभोवती पालिकेच्या शिक्षण विभागाने मैदाने आणि खेळाच्या जागांसाठी पुरेशी जागा उपलब्ध राहील, याची काळजी घेतली आहे. याशिवाय शहर व उपनगरात शिक्षण विभागाची ६४ मैदाने असून, पालिका शाळांच्या मोठ्या स्पर्धा, कार्यक्रम यासाठी ही मैदाने वापरली जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. शालेय जीवनातील ताणतणाव, मोकळे वातावरण याचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो.

६० टक्के जागेवर इमारत, तर ४० टक्के जागेवर खेळासाठी तरतूद

शारीरिक शिक्षणाच्या तासासाठी आणि अन्य वेळीही मुलांसाठी मैदाने महत्त्वाची आहेत. मुलांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्यात क्रीडा गुणांचा विकास व्हावा, या उद्देशाने पालिकेच्या शिक्षण विभागाने शालेय इमारत बांधतानाच ६०:४०चा फॉर्म्युला अंगीकारला आहे, असे कंकाळ म्हणाले. त्यानुसार एकूण जागेच्या ६० टक्के जागेत शाळेचे बांधकाम, तर उर्वरित ४० टक्के जागा ही शैक्षणिक खेळ, उपक्रम यासाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद आहे. यामुळे पालिका शाळेच्या प्रत्येक इमारतीला खेळासाठी मैदान उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडक आरक्षित मैदानांची नावे

बजाज रोड, कांदिवली पश्चिम शात्रीनगर शाळा, सांताक्रुझ सीबीएसई शाळा मिठागर, मुलुंड पूर्व काणेनगर सीबीएसई शाळा, अॅटॉप हिल, वडाळा पूर्वकलेक्टर शाळा, चेंबूर मोतीलाल नगर, गोरेगाव पश्चिम

६४ आरक्षित मैदाने 

प्रत्येक शालेय इमारतीव्यतिरिक्त पालिका शाळांकडे ६४ मैदाने शिक्षण विभागासाठी आरक्षित आहेत. 

मोठ्या क्रीडा स्पर्धा, उपक्रम, शालेय मनोरंजन कार्यक्रम, आदी भरवले जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कंकाळ यांनी दिली.

पालिकेच्या शिक्षण विभागाची क्रीडा कुंभ स्पर्धा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, पालिका शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शिवकालीन पारंपरिक देशी खेळांचा परिचय व्हावा, या उद्देशाने एकूण १६ प्रकारच्या खेळांचा समावेश असलेली 'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका