Join us

मुंबई विद्यापीठात ६०-४० गुणांचा पॅटर्न; नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार लागू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 8:35 AM

४० गुणांकरिता विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन स्तरावर (अंतर्गत) मूल्यमापन केले जाणार आहे. तर, वर्षाअखेर होणारी लेखी परीक्षा केवळ ६० गुणांची असेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विद्यापीठाने नवीन शैक्षणिक वर्षापासून पुन्हा ६०-४० गुणांचा पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ४० गुणांकरिता विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन स्तरावर (अंतर्गत) मूल्यमापन केले जाणार आहे. तर, वर्षाअखेर होणारी लेखी परीक्षा केवळ ६० गुणांची असेल.

२०११-१२ मध्ये मुंबई विद्यापीठात प्रथमच अंतर्गत मूल्यमापनाचा ६०-४०चा पॅटर्न लागू करण्यात आला होता. परंतु, अंतर्गत मूल्यमापनात होणाऱ्या गैरप्रकारांमुळे त्यावेळी बी. कॉमचा निकाल ८० ते ८५ टक्क्यांवर गेला होता. चौकशीअंती काही महाविद्यालयांनी अंतर्गत मूल्यमापनात सढळपणे गुणदान केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर २०१६-१७मध्ये अंतर्गत मूल्यमापन पूर्णपणे बंद करण्यात आले. तेव्हापासून केवळ सेल्फ फायनान्स कोर्सेस, एलएलबी वगळता इतर अभ्यासक्रमांचे निकाल वार्षिक १०० गुणांच्या लेखी परीक्षेआधारेच जाहीर केले जात आहेत. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी. या अभ्यासक्रमांकरिता पुन्हा हा पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. विद्यापीठाने त्या संदर्भात एक परिपत्रक जारी करत वार्षिक लेखी परीक्षा ६० गुणांची आणि अंतर्गत मूल्यमापन ४० गुणांचे असेल, असे स्पष्ट केले आहे. उपस्थिती वाढेल 

वर्गातील उपस्थितीलाही अंतर्गत मूल्यमापनात गृहीत धरले जाते. विद्यार्थ्यांची वर्गातील हजेरी यामुळे वाढेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

स्वायत्त महाविद्यालयात अंमलबजावणी सुरू 

स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये हा पॅटर्न आधीपासूनच राबविला जात आहे.

सातत्यपूर्ण मूल्यमापन

अंतर्गत मूल्यमापन प्रात्यक्षिके, प्रोजेक्ट, उपस्थिती, असाइनमेंट, टेस्ट यांआधारे ठरते. यामुळे वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होईल, अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबई विद्यापीठ