अस्वच्छता! मुंबईकरांकडून ६० कोटींचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:07 AM2023-11-30T11:07:41+5:302023-11-30T11:07:55+5:30
क्लीन अप मार्शल पुरवणारी कंपनी मालामाल.
मुंबई: अस्वच्छता करताय? अस्वच्छता केल्याने स्वतःच्या खिशातून दंडही भरा. तुमच्या या सवयींमुळे तुमचा खिसा हलका होतोय, शिवाय चारचौघांत बदनामीही होते. दुसरीकडे या सवयीमुळे दुसऱ्याचा खिसा मात्र भरला जात आहे. हो, हे खरे आहे. २०२०-२०२२ या दोन वर्षात क्लीन अप मार्शलने तब्ब्ल ६० कोटींचा दंड मुंबईकरांना ठोठावला आहे. ३६ लाख मुंबईकर त्यांच्या कचाट्यात सापडले होते.
अस्वच्छता करण्याच्या या ‘छंदापोटी’ मुंबईकरांनी एवढ्या पैशाचा एकप्रकारे चुराडा केला आहे. या दंडातील काही रक्कम मुंबई महापालिकेच्या तिजोरीतही गेली आहे. या आर्थिक फटक्यातून लोक बोध घेतात की नाही, हे लवकरच दिसेल. कारण पुन्हा एकदा रस्त्यावर क्लीन अप मार्शलचा पहारा असेल.
खंडित सेवा:
२००७ पासून सर्वप्रथम मार्शल नियुक्त करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी पालिकेने खासगी कंपनीला कंत्राट दिले होते. दंडापोटी जो काही महसूल जमा होईल, त्यापैकी ५०-५० टक्के महसूल संबंधित कंपनी आणि महापालिकेला मिळतो.
पुन्हा मार्शल तैनात :
मुंबई महापालिकेने सध्या स्वच्छतेवर भर दिला आहे. मात्र त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज आहे. म्हणून १२०० क्लीन अप मार्शल तैनात केले जाणार आहेत.
मार्शलची उचलबांगडी :
मार्शल धमकावतात, एकप्रकारे खंडणी वसूल केल्यासारखे त्यांचे वर्तन असते, अशा तक्रारी मधल्या काळात महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर आल्या. तक्रारी वाढल्याने अखेर मार्शलची उचलबांगडी करण्यात आली.