६० लाखांची खंडणी घेणारा अटकेत
By admin | Published: May 3, 2017 03:48 AM2017-05-03T03:48:46+5:302017-05-03T03:48:46+5:30
बांधकाम व्यावसायिकाकडून ६० लाखांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली विजय बामा भोईर (रा. रेतीबंदर परिसर) याला मानपाडा
डोंबिवली : बांधकाम व्यावसायिकाकडून ६० लाखांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली विजय बामा भोईर (रा. रेतीबंदर परिसर) याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ४ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक मधुसूदन अरोरा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘मी दावडीतील जमीन विकसित करण्यासाठी घेतली होती. त्यात भोईर हा भागीदार होता. त्याला पैसे भरणे शक्य नसल्याने त्याने जमीन विकासावरील हक्क सोडला होता. त्यानंतरही भोईर माझ्याकडे पैसे मागत होता. पैसे न दिल्यास सरकारी यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचे तो धमकावत होता. त्याने माझ्याकडून रोकड व धनादेशाच्या स्वरूपात ६० लाखांची खंडणी उकळली आहे. त्यानंतरही तो माझ्यामागे पुन्हा पैशांचा तगादा लावत होता.’
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर आणि गुन्हा दाखल होण्यापूर्वीही भोईर याने आरोरा यांना धमकवण्याचा प्रयत्न केला होता. भोईर याच्या अटकेनंतर त्याने अशा प्रकारे अन्य कोणाला सतावले आहे का, त्यांच्याकडून किती पैसे घेतले, या अंगाने पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, भोईर हा स्वत: माहिती अधिकाराच्या चळवळीतील कार्यकर्ता असल्याचे सांगतो. मात्र त्याची नोंद पोलीस तक्रारीत नाही. भोईर याच्याविरोधात २७ गावे संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. (प्रतिनिधी)