Join us

‘डीपी’ घोळातही ६० लाखांची कमाई!

By admin | Published: May 22, 2015 1:36 AM

नागरिकांनी मागितलेला विविध आरक्षणाचा अहवाल, आराखडा तक्ता आणि आराखडा अभिप्राय या माध्यमातून महापालिकेने तब्बल ६० लाखांची कमाई केली आहे.

मुंबई : लक्षणीय चुका, जनतेचा विरोध अशा अनेक कारणांनी गाजलेल्या मुंबई विकास आराखड्यासाठी ६ हजार ८३९ नागरिकांनी मागितलेला विविध आरक्षणाचा अहवाल, आराखडा तक्ता आणि आराखडा अभिप्राय या माध्यमातून महापालिकेने तब्बल ६० लाखांची कमाई केली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारान्वये ही माहिती मिळाली आहे. मुंबई विकास आराखड्यांतर्गत पालिकेकडे आलेल्या अर्जाची, अदा केलेल्या शुल्काची माहिती त्यांनी मागितली होती. पालिकेच्या विकास नियोजन खात्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विकास आराखड्यांतर्गत विकास नियंत्रण नियमावली पुस्तिका, आराखडा अहवाल, आराखडा शीट आणि आराखडा अभिप्रायच्या विक्रीपोटी एकूण ५९ लाख ४८ हजार ८७ रुपये पालिका तिजोरीत जमा झाले. यामध्ये सर्वाधिक रक्कम ३९ लाख ५ हजार ३१२ रुपये विकास आराखडा अभिप्रायाची विक्री करून मिळाले आहेत. २,२२० लोकांनी विकास आराखडा अभिप्राय विकत घेतला. त्यानंतर ४ हजार १३० लोकांनी विकास आराखडा शीट विकत घेत १३ लाख ९५० रुपये पालिकेस अदा केले. ३१२ विकास नियंत्रण नियमावली पुस्तिका विक्रीमागे ४ लाख २५ हजार ८८० रुपये जमा झाले तर विकास आराखडा अहवाल १७७ लोकांनी विकत घेत पालिकेस ३ लाख १५ हजार ९४५ रुपये अदा केले. (प्रतिनिधी)मुंबई विकास आराखड्यातंर्गत प्राप्त सूचना आणि हरकतीवर प्राप्त माहितीनुसार, २७ एप्रिल २०१५ पर्यंत ६४ हजार ८६७ सूचना आणि हरकती प्राप्त झाल्या. मुंबईचा विकास आराखड्यात झालेल्या लक्षणीय चुकांमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ महिन्यांच्या आता चुका दुरुस्त करत सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.