मुंबई : बोरीवली - ठाणे भुयारी मार्गाचा प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असून, आता भूसंपादनाचे कामदेखील प्रगतिपथावर आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रकल्पाला अनिवार्य पर्यावरण मंजुरीपासून सूट देण्यात आली असून, या भुयारी मार्गामुळे ६० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांवर येणार आहे.
सध्या बोरीवली ते ठाणे हे अंतर २३ किमी आहे. मात्र, या प्रकल्पामुळे हे अंतर ११ किमी होईल. ठाण्यातील टिकुजिनीवाडीपासून बोरीवलीजवळील पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत ११ किमी भुयारी मार्गामुळे इंधन आणि वेळ वाचणार आहे. शिवाय पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे. मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होईल.
भुयारी मार्गासाठी १६.५४ हेक्टर खासगी जमीन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची भूमिगत ४०.४६ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. उद्यानाला या मोबदल्यात जमीन वितरित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ११ हजार २३५.४३ कोटी रुपये खर्च येईल. हा मार्ग उद्यानाखालून जाणार आहे. प्रकल्पाच्या कामामुळे उद्यानाला हानी पोहचू नये म्हणून भुयाराचे काम टनेल बोरिंग मशीनने करण्यात येईल.
भुयारात ३ अधिक ३ अशा सहा मार्गिका असतील.
ताशी ८० कि.मी वेगाने वाहने धावतील.
प्रत्येक ३०० मीटरवर क्रॉस टनेल असतील.
ड्रेनेज सिस्टिम, स्मोक डिटेक्टर आणि जेट फॅन असतील.
कनेक्टिव्हिटी : पश्चिम द्रुतगती मार्ग, एनएच ३, घोडबंदर रोड
साडेपाच वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन!
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा प्रकल्प प्रस्तावित केला होता. त्यानंतर हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. भूसंपादनानंतर मार्च २०२२ रोजी प्रकल्पाचे काम सुरू होईल. साडेपाच वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.