राज्यातील ६० जण करोना निगेटिव्ह, पाच जण रुग्णालयात निरीक्षणाखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 07:42 PM2020-02-17T19:42:48+5:302020-02-17T19:51:36+5:30
corona virus : आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३८ हजार १३१ प्रवासी तपासण्यात आले आहेत.
मुंबई - राज्यात विविध रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या ६४ जणांपैकी ६० जणांचा प्रयोगशाळा नमुना अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. ५९ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सध्या पाच जण निरीक्षणाखाली असून त्यातील दोन जण मुंबईत तर तीन जण सांगली येथे भरती आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण २२० प्रवाशांपैकी १३८ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३८ हजार १३१ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ६४ जणांना भरती करण्यात आले. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ६० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. ६४ जणांपैकी ५९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.