नवी दिल्ली - वाढत्या प्रदूषणामुळेआरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने मुंबई, दिल्लीतील १० पैकी ६ व्यक्ती म्हणजे ६० टक्के नागरिक शहरापासून दूर स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत. आरोग्यविषयक सेवा पुरवठा कंपनी प्रिस्टिन केअरने मुंबई, दिल्ली आणि परिसरातील चार हजार लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले. प्रदूषणामुळे अनेकांच्या आरोग्याच्या त्रासात भर पडल्याचेही सर्वेक्षणातून पुढे आले, तसेच सकाळच्या वेळेत प्रदूषणामुळे व्यायाम थांबल्याचे नागरिकांनी सांगितले. त्याचा आरोग्यावर, जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
९० टक्के लोकांना श्वसनविकारसर्वेक्षणात सहभागी १० पैकी ९ लोकांनी वायुप्रदूषणामुळे खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, जीव घाबरणे, घशात खवखव तसेच डोळ्यांतून पाणी येण्याचा त्रास होत असल्याचे सांगितले. वायू गुणवत्ता निर्देशांक घसरल्यावर आणि हिवाळ्यात हा त्रास अधिक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अस्थमाचा त्रास वाढलाहिवाळ्याच्या कालावधीत दम्याचा (अस्थमाचा) त्रास पूर्वीपेक्षा अधिक वाढल्याचे ४० टक्के लोकांनी म्हटले आहे. त्यांना मागील काही काळात दरवर्षी आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे.
मॉर्निंग वॉक बंदवाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. ३५ टक्के नागरिकांनी मॉर्निंग वॉक किंवा सकाळी व्यायामाला जाणे बंद केले, तसेच ३० टक्के नागरिकांनी नियमित मास्क वापरत असल्याचे सांगितले.
एअर प्युरिफायर वाढलेदिल्ली, मुंबईतील २७% नागरिकांनी एअर प्युरिफायर वापरणे सुरु केले पण त्याची प्रतिकार क्षमता कमी असल्याचे ४३% नागरिकांनी सांगितले.