कल्याण तालुक्यात २० ग्रामपंचायतींत ६० टक्के मतदान

By Admin | Published: November 24, 2014 01:07 AM2014-11-24T01:07:10+5:302014-11-24T01:07:10+5:30

कल्याण तालुक्यातील २० ग्रामपंचायतींची निवडणूक आज शांततेत पार पडली. या निवडणुकीत सुमारे ६० टक्के मतदान झाले.

60 percent polling in 20 panchayats in Kalyan taluka | कल्याण तालुक्यात २० ग्रामपंचायतींत ६० टक्के मतदान

कल्याण तालुक्यात २० ग्रामपंचायतींत ६० टक्के मतदान

googlenewsNext

नांदिवली : कल्याण तालुक्यातील २० ग्रामपंचायतींची निवडणूक आज शांततेत पार पडली. या निवडणुकीत सुमारे ६० टक्के मतदान झाले. कुठल्याही गावात अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे मतदानासाठी घराबाहेर पडले होते. विशेषत: महिलावर्ग मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी येत असल्याचे दिसून आले. शहरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो. पाच ग्रामपंचायतींत बिनविरोध निवडणूक झाली आहे. मात्र, या निवडणुकीत कोणताही गाजावाजा न करता मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला. सोमवारी कल्याण येथील सर्वाेदय मॉल येथे मतमोजणी होणार आहे.
नांदिवली पंचानंद ग्रामपंचायतीत होली एन्जल्स् स्कूल येथील मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे बूथ होते. या वेळी ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक देवानंद भोईर यांनी या वेळी सांगितले की, अजूनही ग्रामीण भागात शासन पोहोचले नाही. त्याकरिता, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना भेटून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास शहराप्रमाणे करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार आयोजित करावा, अशी मागणी केली होती. नवीन येणाऱ्या पालकमंत्र्यांकडेही तशीच मागणी करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. उमेदवार संजय म्हात्रे यांनी कचऱ्याचे रिसायकलिंग करणाऱ्यासाठी पुण्याला हरित लवादाकडे चर्चा केली असून बायोगॅसनिर्मिती करून कचऱ्याचा प्रश्न सोडविला जाईल, असे सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळेत भोपर-देसले ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे केंद्र होते. या केंद्रांबाहेर मतदान करण्यासाठी मतदारांची मोठी रांग लागली होती. उमेदवार सुनंदा माळी, छाया माळी व विश्वास माळी यांनी गावाच्या विकासाकरिता जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगत गावात पाण्याचा आणि रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याकरिता निवडणूक आल्यानंतर प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, सर्वपक्षीय गाव विकास समितीचे उमेदवार गुरुनाथ पाटील व पुष्पा पाटील यांनी गावाच्या विकासाकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. सर्वपक्षीय देसलेपाडा लोढा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार दिलीप देसले, आकाश देसले व पूर्णिमा देसले यांनी रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सूविधा मिळणे आवश्यक असून त्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Web Title: 60 percent polling in 20 panchayats in Kalyan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.