संधिवाताच्या रुग्णांमध्ये ६० टक्के महिला
By admin | Published: October 12, 2015 05:01 AM2015-10-12T05:01:36+5:302015-10-12T05:01:36+5:30
जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारात संधिवाताचे प्रमाण जास्त आहे. देशातील १५ टक्के जनतेला संधिवाताचा त्रास भेडसावत आहे.
मुंबई : जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारात संधिवाताचे प्रमाण जास्त आहे. देशातील १५ टक्के जनतेला संधिवाताचा त्रास भेडसावत आहे. याचाच अर्थ सुमारे १८ कोटी जनतेला संधिवाताचे दुखणे असून, यातील ६० टक्के रुग्ण महिला आहेत.
आर्थरायटिस इंडियाच्या संकेतस्थळाप्रमाणे, एड्स आणि कर्करोग रुग्णांपेक्षा संधिवात असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण ६० टक्के इतके आहे. देशातील महिलांना संधिवात होण्याचा धोका जगाच्या तुलनेत तीनपट अधिक आहे. देशातील महिला व्यायाम करत नाहीत, संतुलित आहाराचा अभाव, घरातली कामे करताना वाकून कामे करतात, बराच काळ खाली बसून कामे करणे आणि वजन जास्त असणे ही महिलांना संधिवात होण्याची प्रमुख कारणे असल्याचे केईएम रुग्णालयाचे आॅर्थोपेडिक्स सर्जन डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.
संधिवाताचा परिणाम थेट कार्यक्षमतेवर होतो. हे सहज टाळता येऊ शकते. सध्याच्या जीवनशैलीमुळे संधिवाताचे प्रमाण वाढत आहे, याला आळा घातल्यास आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत ६५ वर्षांवरील व्यक्तींना संधिवाताचा त्रास होत असे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे हे वय कमी होऊन ३५ ते ५५ इतके झाले आहे. आपल्या देशात संधिवाताचा आॅस्टिओआर्थरायटिस हा प्रकार जास्त प्रमाणात आढळून येतो, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.
संधिवाताची लक्षणे आढळून आल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. संधिवात टाळण्यासाठी स्नायू आणि हाडे मजबूत, सक्षम बनविली पाहिजेत, त्यामुळे सांधे लवचीक राहतात. त्यामुळे संधिवात टाळण्यासाठी विशेष काळजी घ्या, असे मत तज्ज्ञांनी मांडले. (प्रतिनिधी)