नोंदणी घटली; पाळणा लांबला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दीड वर्षापूर्वी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसह कोरोना महामारीचा फटका विवाह सोहळ्यांना माेठ्या प्रमाणावर बसला आहे. कोरोना काळातील दीड वर्षात झालेल्या विवाह सोहळ्यांची तुलना त्यापूर्वीच्या २०१७-१८-१९ सालाशी करता हे प्रमाण ६० टक्क्यांनी घटले. म्हणजेच कोरोना, लॉकडाऊनच्या काळात विवाह होण्याचे प्रमाण केवळ ४० टक्के आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे सरकारी आणि निमसरकारी कार्यालयेही बंद असल्याने किंवा येथील सेवांचे प्रमाण तोकडे असल्याने रजिस्ट्रार कार्यालयातील विवाह सोहळ्यांसह नोंदणीलाही विलंब झाला असून, हे प्रमाणही घटले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना आता नियंत्रणात आला असला तरीही अद्याप त्याचा पूर्णत: बीमोड झालेला नाही. परिणामी आजही अनेक घटकांवर बंधने आहेत. विवाह सोहळ्यांनाही याचा फटका बसला असून, विवाह सोहळ्यांशी निगडित असलेले म्हणजे वाजंत्री, हॉल, कॅटरर्स यांच्यासह संबंधित प्रत्येक घटक तोट्यात आहे. याबाबत अधिक माहिती देताना पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले की, अनेकांनी आपले विवाह सोहळे पुढे ढकलले. मे महिन्यात १६ मुहूर्त आहेत. जूनमध्ये ८ आणि जुलैमध्ये ४ मुहूर्त आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये चातुर्मास आहे. तेव्हा मुहूर्त नाहीत. नोव्हेंबरमध्ये ४ आणि डिसेंबरमध्ये ११ मुहूर्त आहेत.
मात्र आता पंचागकर्ते चातुर्मासातही विवाह मुहूर्त देत आहेत. कारण लोकसंख्या वाढली आहे. हॉल मिळत नाही आणि यास ग्रंथांमध्येदेखील आधार आहे. त्यामुळे चातुर्मासातही मुहूर्त दिले जात आहेत. मात्र दोन तासांत लग्न कसे आटपायचे? असा प्रश्न लोकांना पडला आहे. मात्र मी यावर म्हटले आहे की आपल्याकडे वैदिक पद्धतीने एक सोय आहे. यामध्ये सगळे विधी अगोदर करायचे आणि माळ घालायचा कार्यक्रम शेवटी करायचा. हे सगळे घरी करता येते. बाकी माळ घालण्याचा कार्यक्रम हॉलमध्ये करता येतो. यास पंधरा मिनिटेही लागत नाहीत. २५ माणसे बोलाविण्यासाठी लग्नही ऑनलाईन करता येते. हा सोहळा आपण आपल्या नातेवाईकांना ऑनलाईन दाखवू शकताे. लग्न पुढे ढकलून प्रश्न सुटणार नाही. कारण कोरोनाचे समूळ उच्चाटन कधी होईल, हे सांगता येत नाही, असेही सोमण यांनी सांगितले.
.......................................................
रजिस्टार कार्यालयात विवाहाचे प्रमाण कमी
काही जण २५ लोक बोलवून हॉलमध्ये लग्न करत आहेत. मात्र त्यांना सरतेशेवटी नोंदणी करण्यास नोंदणी कार्यालयात प्रमाणपत्रासाठी जावेच लागते. परंतु कोरोना महामारीमुळे नोंदणी कार्यालयाच्या कामातदेखील अडचणी असल्याने त्यासही विलंब होत आहे. रजिस्टार कार्यालयातदेखील विवाह करणारे आहेत. मात्र तुलनेने हे प्रमाण कमी आहे.
---------------
विवाह नोंदणीचे प्रमाण घटले
कोरोनाच्या भीतीने लोक बाहेर पडत नाहीत. सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयात जात नाहीत. लसीकरणदेखील वेगाने होत नाही. त्यामुळे विवाहाची नोंदणी करायची झाली तरी महापालिकेच्या कार्यालयात जाण्यास नागरिक कोरोनामुळे घाबरत आहेत. कारण येथे अथवा प्रवासादरम्यान, लोकांचा अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची भीती असते. परिणामी विवाह नोंदणीस विलंब होत असल्याने त्याचा नेमका आकडा समोर येत नाही.
- सागर उगले, माहिती अधिकार कार्यकर्ते
---------------
बालविवाहाचे प्रमाण वाढले
कोरोना महामारीमुळे बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. काही प्रकरणे समोर आली होती. कारण आईवडील आर्थिकदृष्ट्या कुमकुवत आहेत. घाबरून बालविवाहाचे प्रमाण वाढले. दरम्यान, नियमावलीला लोकांनी केराची टोपली दाखविली. ऑनलाईन लग्नाचादेखील ट्रेंड आला आहे.
- वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्ते
---------------
जन्म नोंदणी
२०१७ - १५४६४२
२०१८ - १५११८७
२०१९ - १४८८९८
२०१७ मध्ये १ हजार नागरिकांमागे जन्मदर हा १२.१४ टक्के होता. तर २०१८ मध्ये ११.८३ आणि २०१९ मध्ये ११.६१ पर्यंत खाली आहे.
---------------
मृत्यू
२०१६ - ३८९३८
२०१७ - ८९०३७
२०१८ - ८८८५२
२०१९ - ९१२२३
२०२० - ७३६५५
---------------