- कन्नमवार नगरवासीयांची व्यथा; छताला गळती, भिंतींना फुटला पाझर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कन्नमवार नगरमधील ६०च्या दशकात बांधलेल्या इमारती आता जीर्ण झाल्या आहेत. त्यातील काही इमारतींच्या जागी टोलेजंग टॉवर उभे राहिले असले तरी, निम्म्याहून अधिक पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळ्यात येथील रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पावसाळा जवळ आला की आम्हाला धडकी भरते अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली.
तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या संकल्पनेतून ही २६५ इमारतींची वसाहत उभी राहिली. पोलीस, कामगार, परिचारिका, मागासवर्गीय समाज आणि इतर वर्गासाठी त्यात जागा राखीव ठेवण्यात आली. अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटानुरूप त्याची रचना करण्यात आली. आज ६० वर्षांनंतर यातील निम्म्याहून अधिक इमारती पुनर्विकासाअभावी जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना पावसाळ्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
मुख्य समस्या आहे ती छत गळण्याची. पाऊस सुरू झाला की पहिल्या १० दिवसांतच छत झिरपण्यास सुरुवात होते. वरच्या मजल्यावर राहणाऱ्याला याचा सर्वाधिक त्रास होतो. शिवाय दक्षिण दिशेने पावसाचा मारा सुरू झाला की या जीर्ण इमारतींच्या भिंतीही पाझरण्यास सुरुवात होते, अशी माहिती स्थानिक रहिवासी प्रवीण अहिरे यांनी दिली.
छत आणि भिंती पाझरण्यासोबतच पाण्याच्या टाक्यांमधूनही गळती होते. शिवाय जीर्ण झालेल्या मलजल वाहिन्यांची वहन क्षमता जवळपास संपुष्टात आल्याने गटार तुंबण्याचे प्रकार घडतात. अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्यास इमारत खचण्याच्या घटनाही मागच्या काही वर्षांत घडल्याचे इमारत क्रमांक १९४ मधील रहिवासी रजनीकांत साळवी यांनी सांगितले.
* स्वखर्चाने रहिवासी करतात डागडुजी
पावसाळ्याआधी आम्ही स्वखर्चाने डागडुजी करतो. छतावर ताडपत्री टाकणे, गळती रोखण्यासाठी वॉटरप्रुफिंग अशी कामे केली जातात. मागे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता ५६ लाखांचा खर्च सांगण्यात आला, तो परवडण्यासारखा नाही. त्यामुळे संस्थेला जमतील तशी दुरुस्ती कामे हाती घेतली जातात.
- प्रशांत अहिरे, सचिव, हायवे व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कन्नमवार नगर
------------------------------------
.........
अडचणी काय?
- छत ताडपत्रीने झाकले तरी पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ते उडून जाते. नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळावेळीही या समस्येचा सामना करावा लागला.
- लोकजागृतीमुळे अनेक सोसायट्यांनी स्वयंपुनर्विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. परंतु, बँकाकडून कर्ज न मिळाल्याने त्याला फारशी गती नाही.
- अनेक विकासकही पुढे आले आहेत, त्यांच्यामार्फत बऱ्याच इमारतींचा पुनर्विकास झाला. परंतु, म्हाडाकडे देयके प्रलंबित असणे, कायदेशीर प्रक्रिया आणि कन्व्हेयन्सअभावी निम्म्याहून अधिक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.
......
दरवर्षी खर्च किती येतो?
छत झाकण्यासाठी - २५ ते ३० हजार
वॉटरप्रुफिंगसाठी - एक लाखाहून अधिक