Join us

ब्रेन ट्यूमर असणाऱ्या ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेवर रिलायन्स रुग्णालयात यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्करोगावरील शस्त्रक्रियेला कोरोनादेखील थांबवू शकत नाही, हे नवी मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखवून दिले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कर्करोगावरील शस्त्रक्रियेला कोरोनादेखील थांबवू शकत नाही, हे नवी मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखवून दिले आहे. मुंबईतील रहिवासी असणाऱ्या सावित्री (६०) या कर्करोगग्रस्त महिलेवर कोरोनाबाधित असतानादेखील यशस्वीरीत्या रेडिएशन थेरपी करण्यात आली.

सावित्री यांना मेटॅस्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. कर्करोग त्यांच्या मेंदूपर्यंत पसरल्याने सावित्री यांची तब्येत वेगाने ढासळत होती. त्यामुळे संपूर्ण मेंदूला रेडिएशन थेरपी तातडीने देणे अत्यावश्यक होते. या शस्त्रक्रियेआधी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि डॉक्टरांसमोर मोठा पेच उभा राहिला. रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत थांबल्यास मेंदूचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती. अखेर मेडिकल ऑन्कोलॉजी कन्सल्टंट डॉ. सुरेश अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रतिबंधात्मक काळजी आणि संसर्ग नियंत्रण उपाययोजना करून रेडिएशन थेरपी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रेडिएशन थेरपी यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर त्या शुद्धीत होत्या आणि वेळ, जागा व व्यक्ती ओळखत होत्या, तसेच आपल्या नातेवाइकांसोबत पुन्हा नीट बोलू लागल्या. कोणत्याही आधाराविना आपण चालू शकतो याचा त्यांना खूप आनंद झाला आहे. दोन आठवड्यांनंतर त्यांचा काेराेना रिपोर्टही निगेटिव्ह आला. ‘होल ब्रेन रेडिओथेरपी’च्या स्वरूपात तातडीने उपचार केल्यानेच हे शक्य झाले.

याबद्दल डॉ. सुरेश अडवाणी यांनी सांगितले की, सावित्री यांना स्तनाचा कर्करोग झाला होता, जो त्यांच्या मेंदू आणि शरीरातील इतर अवयवांपर्यंत पसरला होता. एमआरआयमध्ये आढळून आले की, मेंदूवरील आघातामुळे मेंदूतील पेशींना सूज आली होती, त्यामुळे शरीराची उजवी बाजू लुळी पडली होती. त्या व्हीलचेअरवर होत्या. त्यांची तब्येत वेगाने ढासळत असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. अन्यथा त्यांची तब्येत अधिकच बिघडली असती.

ऑन्कोलॉजी कन्सल्टंट डॉ. दीपक पी. कुमार यांनी सांगितले, ‘आम्ही संपूर्ण उपचारांचे नियोजन आखले व रेडिएशन देणे सुरू करण्यासाठी एक वेळापत्रक बनविले. रुग्णालयाच्या धोरणानुसार उपचार सुरू करण्याच्या एक दिवस आधी रुग्णाची कोविड आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आमच्यासमोर पेच निर्माण झाला. डॉ. शिवम शिंगला आणि डॉ. दीपक कुमार या डॉ. सुरेश अडवाणींच्या टीममधील सदस्यांनी धोक्यांचा अभ्यास केला आणि अखेर शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले व ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.’

................................................................