ऑपरेशन ऑल आऊट मोहीम : २५९ ठिकाणी धाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलिसांनी अवघ्या तीन तासात तडीपार असलेल्या ३७ समाजकटकांसह एकूण ५९९ आरोपींची धरपकड केली. त्यामध्ये ३९ जण फरारी व पाहिजे असलेले गुन्हेगार होते.
ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेंतर्गत शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये शहर व उपनगरात विविध एकूण २५९ ठिकाणी कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. व्हॅलेंटाईन डे आणि शिवजयंतीच्या पाश्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी शनिवारी रात्री ११ ते २ वाजेपर्यंत ही मोहीम घेण्यात आली. त्यामध्ये सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ५ विभागाचे अप्पर आयुक्त, १३ परिमंडळीय उपायुक्त, सर्व एसीपी आणि त्याखालील सर्व अधिकाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईमध्ये २५९ ठिकाणी कोबिंग ऑपरेशन करून रेकॉर्डवरील १,२७८ आरोपीची झडती घेण्यात आली. त्यात ३९ पाहिजे व फरारी आरोपीसह ५९९ जणांना अटक केली. दत्तक आरोपी योजनेंतर्गत १,५६१ जणांना तपासण्यात आले. अमली पदार्थ बाळगणाऱ्या ८८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली तर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यावर ३७ जणांवर गुन्हे दाखल करून ती जप्त केली. तर अजामीनपात्र वाॅरंटमधील १७६ जणांना अटक केली.
शहरातील एकूण ९५१ हॉटेल, लॉजेस, मुसफिरखाने तपासण्यात आले. यात तडीपार असलेल्या ३७ जणांना पकडण्यात आले. तर अवैध धंदे सुरू असलेल्या ४२ ठिकाणी छापे टाकून ७१ जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढेही राबविण्यात येणार असल्याचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.