६०० कोटींचा घोटाळा; अंबर दलाल अटकेत; १३०० सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 07:33 AM2024-12-01T07:33:00+5:302024-12-01T07:33:12+5:30
ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर त्याची कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने आता त्याचा ताबा ईडीला दिल्यानंतर तो आता ईडीच्या अटकेत आला आहे.
मुंबई : भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर २२ टक्क्यांच्या अवास्तव परताव्याचे प्रलोभन दाखवत गुंतवणूकदारांना ६०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अंबर दलाल याला ईडीने अटक केली आहे. १३०० सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या दलाल याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर त्याची कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने आता त्याचा ताबा ईडीला दिल्यानंतर तो आता ईडीच्या अटकेत आला आहे.
व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या अंबर दलाल याने भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे प्रलोभन देत एकूण १३०० गुंतवणूकदारांकडून ६०० कोटी रुपये गोळा केले होते. त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये बॉलिवूडमधील काही कलाकारांचाही समावेश आहे. सोने, चांदी, खनिज तेल, नैसर्गिक गॅस, तांबे, पितळ यासह भांडवली बाजारातील उत्पादनांत गुंतवणूक करत त्यावर १८ ते २२ टक्क्यांचा परतावा देण्यात येईल, असे त्याने गुंतवणूकदारांना सांगितले होते. हीच कार्यपद्धती वापरून त्याने यूएई आणि अमेरिकेतील लोकांकडून देखील गुंतवणुकीसाठी पैसे मिळवले होते.
६७ कोटींची मालमत्ता जप्त
सुरुवातीला नवा गुंतवणूकदार आला की तो त्या आधी आलेल्या गुंतवणूकदाराला परतावा देत होता. मात्र, कालांतराने त्याने गुंतवणूकदारांच्या पैशांतून आपल्या परदेशात मालमत्तांची खरेदी केल्याचे निदर्शनास आले. भारतात आणि दुबईत त्याने या मालमत्तांची खरेदी केली आहे. दरम्यान, २१ जून आणि ३ सप्टेंबर रोजी ईडीने त्याच्याशी निगडित ठिकाणी छापेमारी करत आतापर्यंत त्याची ६७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.