लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त सोने खरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जातो. यानिमित्त सोन्याचे दागिने, नाणी खरेदी करण्यासाठी शनिवारी सोन्याच्या दुकानात मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे सोन्याची जोरदार खरेदी-विक्री झाली असून यंदा सोन्याची ६०० कोटींपर्यंत उलाढाल झाली असल्याचे सोने व्यापाऱ्यांनी सांगितले.
शनिवारी अक्षय्य तृतीयेची सुरुवात जोरदार झाली. सकाळपासून राज्यभरातील सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. बुलियन आणि दागिने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत होता. लग्नासाठी लागणारे दागिने, हिऱ्याचे दागिने, हलक्या वजनाचे दागिने व चांदीच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती होती. दागिन्यांच्या विक्री प्रमाणाचा विचार करता गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी १५ टक्के तर मूल्याचा विचार करता सुमारे ४० टक्के वाढ दिसून आली.
दरम्यान, गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला साधारण २८ टन दागिने खरेदी झाली होती. यावर्षी हा आकडा १०० टन असल्याचा अंदाज आहे. शिवाय, या व्यवहारात जवळपास ५०० ते ६०० कोटींची उलाढाल झाली असल्याचे मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले.
यंदाची अक्षय्य तृतीया सोनेविक्रेते आणि ग्राहकांसाठी वेगळीच होती. सोन्याला उच्च भाव असूनही सोने खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून आला. या वर्षी दागिन्यांच्या एकूण विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले. ४० टक्के पेक्षा जास्त वाढ असल्याचा अंदाज आहे. - सैयम मेहरा, अध्यक्ष, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल