Join us

पाकिस्तानातील भारतीय 600 मच्छिमारांची सुटका होणार

By मनोहर कुंभेजकर | Published: May 05, 2023 4:43 PM

आपल्या देशातील 666 मच्छिमार पाकिस्तान तुरुंगात आहेत तसेच पाकिस्तानातील 83 मच्छिमार भारतामध्ये आहेत.

मुंबई-आपल्या देशातील 666 मच्छिमार पाकिस्तान तुरुंगात आहेत तसेच पाकिस्तानातील 83 मच्छिमार भारतामध्ये आहेत, त्यांची सुटका व्हावी म्हणून गेल्या 5-6 वर्षांपासून नॅशनल फिशवर्कर्स फोरम ( एनएफएफ ) ही राष्ट्रीय मच्छिमार संघटना प्रयत्न करत आहेत.दोन्ही देशातील मच्छिमारांची सुटका करावी म्हणून दोन्ही देशांत दि. 13 एप्रिल 2023 रोजी अहमदाबाद व कराची येथे मच्छिमार नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान मोहमद शरीफ यांना आपल्या देशांत तुरुंगात असलेल्या मच्छिमारांना त्वरित सोडण्यात यावे असे विंनती वजा पत्र दिले होते.

 यावेळी दोन्ही देशातील मच्छिमाराना सोडले नाही तर आम्ही युनो मध्ये हा प्रश्न नेऊ असे एनएफएफचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी सांगितले.परंतू दोन्ही देशाकडून कहीही प्रतिसाद न मिळाल्याने नॅशनल फिशवर्कर्स फोरमने याबाबत प्रथम  सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करावी म्हणून  दिल्ली फोरम कार्यालय दिल्ली येथे दि,4 मे  रोजी सकाळी 11 वाजता सभा घेतली. त्यानंतर दुपारी 3.00 वाजता सुप्रिम कोर्टातील वकील कुरियाकोसे वर्गिस तसेच त्यांचे सहाय्यक वकील अक्षत गंगोल व श्रीमती ईशा यांच्या बरोबर याचिका दाखल करण्याबाबतच्या मुद्यांवर चर्चा केली.

यावेळी नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल, दिल्ली फोरमचे चेअरमन विजयन,अखिल गुजरात मच्छिमार समाजाचे वेलजीभाई मसाणी, जेष्ठ पत्रकार जतीन देसाई,पोरबंदर मच्छिमार समाजाचे जीवनभाई  जुंगी, एविता दास,दिल्ली फोरमच्या रोशनी रॉस व पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसीच्या को ऑडीनेटर ऐश्वर्या बाजपेयी आदी उपस्थित  होते.

सदर चर्चा सुरु असतानाच पाकिस्तान मीडिया व मच्छिमार नेत्या कडून अभूतपूर्व, आश्चर्यकारक गोड  बातम्या आल्या की, पाकिस्तानात अटकेत असलेल्या 666 मच्छिमारापैकी 600  मच्छिमारांची सोडण्याची अधिकृत तारीख  दि,13 मे रोजी  पाकिस्तान सरकार कडून घोषित केली आहे, मिडीया रिपोर्ट नुसार  200 जणांची रिलीज ऑर्डर प्रक्रिया पूर्ण     झाली आहे. बाकी 400 जणांचीही ऑर्डर निघेल अशी माहिती मिळाली असल्याचे नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे  उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी लोकमतला दिली.

दोन्ही देशातील मच्छिमारांची सुटका  होण्यासाठी पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी (PIPFPD ) दक्षिण आशिया एकता गट, पाकिस्तान मच्छिमार संघटना  पदाधिकारी यांच्या सहकार्या बद्दल आभार तसेच नॅशनल कमिशन ऑफ ह्यूमन राईट्स पाकिस्तांनच्या अध्यक्ष्या सुश्री राबिया जवेरी यांचे तांडेल यांनी विशेष आभार मानले.