वर्षभरात ६०० किलो सोने जप्त; मुंबई विमानतळावरील कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 06:26 AM2023-03-30T06:26:06+5:302023-03-30T06:26:23+5:30

तीन वर्षांच्या एकत्रित जप्तीपेक्षा अधिक प्रमाण

600 kg of gold seized in a year; Performance at Mumbai Airport | वर्षभरात ६०० किलो सोने जप्त; मुंबई विमानतळावरील कामगिरी

वर्षभरात ६०० किलो सोने जप्त; मुंबई विमानतळावरील कामगिरी

googlenewsNext

- मनोज गडनीस 

मुंबई : कोरोनाकाळात विमान वाहतुकीबरोबरच सोन्याची तस्करीही थंडावली होती. मात्र, कोरोनाकाळ संपल्यानंतर सोन्याच्या तस्करीनेही भरारी घेतली. मुंबईविमानतळावर चालू वर्षात आतापर्यंत तब्बल ६०४ किलो सोने जप्त  करण्यात आले. यावरून तस्करीचे प्रमाण वाढल्याचे अधोरेखित होते. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या तीन वर्षांत तपास यंत्रणांनी मुंबई विमानतळावरून ५८१ किलो सोने जप्त केले होते. त्या तुलनेत चालू वर्षातील जप्तीचे प्रमाण मोठे आहे. सीमा शुल्क आणि डीआरआय यांनी ही विक्रमी कामगिरी केली आहे. 

तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९-२० या वर्षात देशात सर्वाधिक सोने तस्करी पकडण्याचे काम दिल्ली विमानतळावर झाले होते. त्यावेळी दिल्ली विमानतळावर ४९४ किलो सोने जप्त झाले होते. त्यापाठोपाठ मुंबई विमानतळाचा क्रमांक होता. मुंबई विमानतळावरून त्यावेळी ४०३ किलो सोन्याची जप्ती तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे जगभरातील विमान प्रवास थंडावला असतानाही मुंबई विमानतळावर अनुक्रमे ८७ किलो आणि ९१ किलो सोन्याची जप्ती झाली होती.

परंतु, गेल्या वर्षी एप्रिलपासून सर्वच व्यवहार पूर्ववत झाल्यावर व प्रवासी संख्येने लाखोंचा टप्पा गाठल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या तस्करीमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, सोन्याच्या तस्करीमध्ये गेल्या तीन वर्षांत विविध विमान कंपन्यांचे कर्मचारीही सहभागी असल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन वर्षांत एकूण ५८ विमान कर्मचाऱ्यांना तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सोन्याची पेस्ट हा नवा प्रकार

बॅगेच्या आतील भागात सोन्याची बिस्किटे, पातळ पत्रे किंवा शरीराच्या आतमध्ये सोन्याचे बारीक गोळे करून त्याची तस्करी करण्याचे प्रकार नित्याचे झाले होते. मात्र, यावर्षी सोन्याची पेस्ट करून त्याद्वारे तस्करी करण्यात आल्याचेदेखील प्रकार उघडकीस आले आहेत.

३९ विमानतळांवर वाढली तस्करी

मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बंगळुरूसह देशातील एकूण ३९ विमानतळांवर सोन्याची तस्करी वाढल्याचे दिसून आले आहे. २०२३ च्या वर्षात आतापर्यंत या ३९ विमानतळांवरून तब्बल २५३१ किलो सोने तपास अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. तर अन्य ठिकाणांहून एकूण १४५९ किलो सोन्याची जप्ती करण्यात आली आहे. 

Web Title: 600 kg of gold seized in a year; Performance at Mumbai Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.