- महेश काेलेमुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मुंबादेवी ६०० रुपये. मीटर टॅक्सीतूनमुंबई दर्शन ३००० रुपये. हे दर आहेत मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस बाहेर असलेल्या टॅक्सीचालकांचे. त्यामुळे परगावातून येणाऱ्या प्रवाशांची टॅक्सीचालकांकडून होणारी लूट येथेही कायम आहे.
एलटीटी स्थानकासमोर पूर्वी प्रीपेड रिक्षा-टॅक्सी स्टँड होते. सध्या ते आता बंद आहे. पण, तिथे टॅक्सी उभ्या केल्या जातात. तिथे बोर्डवर प्रीपेड टॅक्सी स्टँड असे लिहिलेले असल्याने गैरसमज होऊन प्रवाशांचे पाय तेथेच वळतात. तिथे उभे असलेले टॅक्सीचालक प्रीपेड स्टँड असल्याचे सांगून ठोक रकमेवर प्रवास करण्यास प्रवाशांना प्रवृत्त करतात. तिथे उभे असलेले ट्रॅफिक पोलिस इतर वाहनांवर कारवाई करत असले, तरी या टॅक्सीचालकांच्या मनमानी कारभाराकडे ते दुर्लक्ष करत असल्याची कैफीयत आता या प्रवाशांनी मांडली आहे.
३ हजारांत मुंबई दर्शनछत्तीसगडवरून आलेल्या चौघांच्या ग्रुपला एका टॅक्सीचालकाने गाठले आणि तुम्ही मुंबईमध्ये नवीन असाल, तर मुंबई दर्शन करा, असे सुचवले. यासाठी त्यांना ३००० भाडे सांगितले. ‘क्या क्या घुमाओग’, असे विचारल्यावर, शाहरूख, अमिताभ बच्चनचा बंगला, सिद्धिविनायक, महालक्ष्मी, गटे वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह फिरवतो, असे त्याने सांगितले.
प्रीपेड टॅक्सी स्टँड बंद आहे, पण तिथे पार्किंग करण्यासाठी आम्हाला वाहतूक पोलिसांना पन्नास रुपये द्यावे लागतात. पोलिसांनी हे पैसे जमा करण्यासाठी एकाला नेमले आहे. त्याच्याकडे आम्ही पैसे देतो. आम्ही एकदा भाडे घेऊन गेलो की, परत एलटीटीला येत नाही. - टॅक्सीचालक
हप्ता द्यावा लागतो साहेब यावेळी एका टॅक्सीचालकाला मुंबादेवीला जाण्यासाठी विचारले असता, त्याने ‘मीटर से नही डायरेक्ट छहसो रुपया भाडा होगा’ असे सांगितले. मुळात मीटरने हे भाडे ३०० ते ३२५ रुपये अपेक्षित आहे. याचे कारण त्याला विचारल्यावर त्याने सांगितले, ‘आम्हाला हप्ता द्यावा लागतो. त्यामुळे आम्ही थोडे जादा पैसे आकारतो.’
एलटीटी स्थानकासमोरच्या लेनवर फक्त प्रवाशांना सोडण्याची मुभा आहे. तिथे कोणी पार्किंग केल्यास किंवा मीटरने जाण्यास नकार दिल्यावर आम्ही कारवाई करतो. - केदार गणेश, हेड कॉन्स्टेबल, वाहतूक पोलिस.