पश्चिम रेल्वेच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासाला मिळाला उजाळा... विविध उपक्रमांचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 07:35 AM2024-01-07T07:35:37+5:302024-01-07T07:36:06+5:30
पश्चिम रेल्वे मुख्यालयाच्या इमारतीला १२५ वर्षे पूर्ण झाल्याचा ऐतिहासिक प्रसंग
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वे मुख्यालयाच्या इमारतीला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिकप्रसंगी पश्चिम रेल्वेने जानेवारीत महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये प्रदर्शन, हेरिटेज वॉक, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. या भव्य उत्सवाचा भाग म्हणून पश्चिम रेल्वेने या प्रतिष्ठित इमारतीचा पहिला हेरिटेज वॉक आयोजित केला.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, शुक्रवारी हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. ज्यात मुख्यालयाच्या इमारतीची वास्तुशिल्प वैशिष्ट्ये आणि चमत्कारांचे स्पष्टीकरण, मेमरी लेनचा टूरचा समावेश होता. यामध्ये तळमजल्यावर हेरिटेज गॅलरी आणि तिसऱ्या मजल्यावर नवीन हेरिटेज लाउंज आहे. तळमजल्यावरील हेरिटेज गॅलरीमध्ये मंगलोर टाइल्स, स्टेशन बेल्स, टेलिफोन इत्यादींसह १५० वर्षांहून अधिक जुन्या कलाकृती आहेत.
गॅलरीमधील एक मनोरंजक वस्तू म्हणजे १०० वर्षे जुनी ट्रॉफी आहे, तसेच १९२३ मध्ये बीबी आणि सीआय रेल्वेच्या ऑफिसर्स मेसला सादर केलेला ट्रम्पेट आहे तो अजूनही वाजविला जाऊ शकतो. गॅलरीमध्ये तत्कालीन कुलाबा स्टेशनची इमारत आणि चर्च गेटला जोडणाऱ्या रेल्वेलाइन्सची असंख्य हेरिटेज छायाचित्रे आहेत.