लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिंडोशीच्या शीला रहेजा उद्यानात मियावाकी पद्धतीने एकूण ६००० वृक्षांची लागवड करण्यात आली.
हवामानातील झालेले बदल आपण सर्वजण अनुभवत आहोत. यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्यासाठी पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही. यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानाची घोषणा केली. या अभियानांतर्गत दिंडोशी विधानसभा क्षेत्रात मियावाकी पद्धतीने शहरी वने विकसित करण्यात यावीत, यासाठी युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित सुनील प्रभू यांनी महापालिका उद्यान विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक हनुमंत गोसावी यांच्याकडे पाठपुरावा करून दिंडोशी, प्रभाग क्रमांक ४० येथील शीला रहेजा उद्यानात मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड सुरू केली.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शासनाच्या कोविड नियमांचे पालन करून या उद्यानात शिवसेना विधी मंडळ मुख्य प्रतोद, आमदार व माजी महापौर सुनील प्रभू व उपमहापौर ॲड. सुहास वाडकर यांच्या हस्ते १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. येथील २००० चौरस मीटर जागेत याआधी ५९०० वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्यामुळे आता ६००० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले.
या उद्यानात ताम्हण, बहावा, जांभूळ, कांचन, बदाम, करंज, फणस, काजू, पिंपळ, खैर, कडुलिंब, साग, आयुर्वेदिक बेहडा, पोफळ, माड, चिंच, स्थानिक भाषेत ऐन या नावाने ओळखले जाणारे अर्जुन वृक्ष, सीताफळ, आंबा, कदंब, महुवा, लिंबू, महोगनी, चिकू, अनंत, आवळा, आपटा अशी भारतीय स्थानिक, आयुर्वेदिक आणि पर्जन्य वृक्ष लागवड करण्यात आल्याची माहिती पी उत्तर उद्यान विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक हनुमंत गोसावी यांनी दिली.
यावेळी उपविभागप्रमुख भाई परब, विद्या गावडे, उपविभाग समन्वयक विनीता विचारे, शाखाप्रमुख संदीप जाधव व संपत मोरे, शाखासंघटक पद्मा राऊळ, शाखा समन्वयक सुवर्णा खांबेकर, युवासेना मुंबई समन्वय समृद्ध शिर्के, विभाग अधिकारी प्रशांत मानकर, उद्यान विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक योगेंद्रसिंग कच्छवा, उद्यानविद्या सहाय्यक मुकेश पवार, कनिष्ठ वृक्ष अधिकारी जयश्री बाबर यांच्यासह सर्व शिवसैनिक, युवासैनिक व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
............................................