लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकलमधून फुकट प्रवासाचा आनंद घेणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान फुकट्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने १७३ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. तर एसी लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही कारवाई केली जात असून, या दंडाच्या रकमेच्या वसुलीत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
एसी लोकलमधील फुकट्या प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी नियमित तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली जात आहे. याद्वारे एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान ६० हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यातून २ कोटी रुपये दंडात्मक रकमेची वसुली करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसह मेल, एक्स्प्रेसमधील प्रामाणिक रेल्वे प्रवाशांना फुकट्या प्रवाशांचा त्रास होत असून, विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे, यासंदर्भात पश्चिम रेल्वेकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे. आता केवळ जनजागृती नाही, तर तिकीट तपासणी मोहिमेला वेग आला असून, पॅसेंजरसह हॉली डे स्पेशल गाड्यांमधील तपासणी वेगाने केली जात आहे.
रात्री प्रवास करणाऱ्यांवर बॅटमॅन टीमची नजरमार्च महिन्यात साहित्यासह विनातिकीट प्रवास करणाऱ्या सुमारे २.७५ लाख प्रवाशांकडून १६.७७ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मार्च महिन्यात १ लाखाहून अधिक प्रकरणांचा छडा लावत ४.८० कोटी रुपये वसूल करण्यात आले.लोकलने रात्री प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेने बॅटमॅन टीम तैनात केल्या आहेत.
हालचालींवर लक्ष या टीम नियमित तपासण्या करीत नाहीत; मात्र, ऐनवेळी मोहिमेला वेग देत प्रवाशांना धडा शिकवितात. विशेषत: फर्स्ट क्लासमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर बॅटमॅनची करडी नजर असते. बॅटमॅनची संकल्पना प्रवाशांनीच सुचवली असून, त्यानुसार या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तिकीट तपासतेवेळी संशयास्पद हालचालींवर टीमकडून लक्ष ठेवले जाते.
मुंबई उपनगरातून ४६.९० कोटींची वसुलीफुकट्या प्रवाशांवर अंकुश बसावा म्हणून कारवाईत सातत्य ठेवले जात आहे. त्यानुसार, फुकट्या प्रवाशांवर करण्यात आलेल्या कारवाईतून १७३.८९ कोटी रुपये दंडात्मक वसुली झाली आहे. यात मुंबई उपनगरीय लोकलमधून प्राप्त दंडात्मक वसुलीची रक्कम ४६.९० कोटी रुपये आहे.