Join us

कारवाईच्या भीतीमुळे लाचेचे ६० हजार शौचालयात फेकले, एसीबीने ड्रेनेजमधून काढले पैसे, अग्निशमनच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 9:39 AM

Bribe Case News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रचलेल्या सापळ्यात अलगद अडकलेल्या या अधिकाऱ्याने त्यातून सुटका करून घेण्यासाठी लाचेची रक्कम चक्क शौचालयात टाकून फ्लश केले. मात्र, एसीबीनेही हार न मानता मलनि:सारण वाहिनीत उतरून लाचेची रक्कम शोधून काढत अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवला

मुंबई  - पाइप गॅसची जोडणी तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेण्याचा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा प्रयत्न चांगलाच अंगलट आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रचलेल्या सापळ्यात अलगद अडकलेल्या या अधिकाऱ्याने त्यातून सुटका करून घेण्यासाठी लाचेची रक्कम चक्क शौचालयात टाकून फ्लश केले. मात्र, एसीबीनेही हार न मानता मलनि:सारण वाहिनीत उतरून लाचेची रक्कम शोधून काढत अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कारवाई दहिसरमध्ये घडली. 

खासगी संस्थेत लायजनिंग ऑफिसर म्हणून काम करत असलेल्या तक्रारदाराकडे बोरिवलीतील एका हॉटेल मालकाच्या पाइप गॅसची जोडणी आणि ना हरकत प्रमाणपत्राचे काम आले. त्याने यासंदर्भात दहिसर येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयातील वरिष्ठ केंद्र अधिकारी प्रल्हाद शितोळे यांची भेट घेतली. त्यांनी हॉटेलची पाहणी करत कामाच्या पूर्ततेसाठी मोबाइल व टाइप करत १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराच्या वरिष्ठांनी त्याला असमर्थता दर्शवली. अखेरीस ६० हजारांवर तडजोड झाली. दरम्यानच्या काळात एसीबीकडे तक्रार नोंदविण्यात आली. ३० ऑगस्टला शितोळे यांनी लाचेची रक्कम कार्यालय इमारतीच्या लिफ्टमध्ये स्वीकारली. मात्र, एसीबीच्या सापळ्याचा संशय येताच घाबरलेल्या शितोळे यांनी घाईघाईने चौथ्या मजल्यावरील घर गाठत ६० हजार रुपये शौचालयात टाकून ते फ्लश केले. एसीबीच्या पथकानेही शितोळे यांच्यामागे धाव घेतली.

तीन तास ड्रेनेज लाइनमध्ये तपास एसीबीच्या सहायक पोलिस आयुक्त भारती मोरे, पोलिस निरीक्षक गणेश परचाके आणि अंमलदार यांनी दोन प्लंबरच्या मदतीने सर्व ड्रेनेज लाइन उघडल्या. तीन फूट खाली उतरून लाचेच्या रकमेपैकी ५७ हजारांची रोकड हस्तगत केली. शितोळेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशाप्रकारे कोणी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच मागितल्यास थेट एसीबीच्या १०६४ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीचे उपमहानिरीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.

टॅग्स :लाच प्रकरणगुन्हेगारीमुंबईभ्रष्टाचार