Join us

तीन महिन्यांत ६,०७८ कोटी रुपयांचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:05 AM

मुंबई : पाचशे चौ.फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट दिल्यानंतर उर्वरित मालमत्ताधारकांना बिले पाठविण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. मात्र, आतापर्यंत ...

मुंबई : पाचशे चौ.फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट दिल्यानंतर उर्वरित मालमत्ताधारकांना बिले पाठविण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ६९० कोटी उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या काळात १,२०० कोटी रुपये जमा झाले होते. शेवटच्या तीन महिन्यांत मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ३१ मार्च, २०२१ पर्यंत ६,७६८ कोटींचे लक्ष्य गाठण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.

जकात कर रद्द झाल्यानंतर मालमत्ता आणि विकास कर हेच महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले आहे. मात्र, गेल्या वर्षी कमी उत्पन्न जमा झाल्यामुळे पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली होती. या मोहिमेला यश मिळत असतानाच, कोरोनाचा प्रसार मुंबईत सुरू झाला. या कामात करनिर्धारण व संकलन विभागाचे कर्मचारी व्यस्त असल्याने ही मोहीम बारगळली.

सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ६,७६८ कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज आहे. दर पाच वर्षांनी करात वाढ केल्यानंतर सुधारित कराला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर, कराची बिले पाठविण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. मात्र, डिसेंबर, २०१९ मध्ये मालमत्ता करातून १,२०० कोटी जमा झाले असताना, या वर्षी आतापर्यंत केवळ ६९० कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांमध्ये महापालिकेला आपले लक्ष्य गाठावे लागणार आहे.

* पालिकेमार्फत दोन लाख ५१ हजार करदात्यांना मालमत्ता कराची बिले पाठविण्यात येत आहेत.

* मार्च २०२१ पूर्वी कराची देयके न भरणाऱ्या करदात्यांना पुढे मासिक दोन टक्के व्याज आकारण्यात येणार आहे.

* पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी दिल्यानंतर उर्वरित मालमत्ताधारकांकडून पाच हजार कोटींचा महसूल जमा होणे अपेक्षित आहे.

* करनिर्धारण व संकलन विभागाने डिसेंबरअखेरपर्यंत शहरातून २१४ कोटी, पूर्व उपनगरातून १४४.२६ कोटी आणि पश्चिम उपनगरातून ३३०.३० कोटी रुपये महसूल जमा केला आहे.