शाळा सुरु झाल्यावरही शाळेत मुलांना पाठ्वण्यासंदर्भात ६१ % पालक साशंक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 07:23 PM2020-06-17T19:23:26+5:302020-06-17T19:23:55+5:30
५५ % विद्यार्थी पालकांची मात्र शाळा सुरु झाल्यावरही ऑनलाईन लर्निंग सुरु ठेवण्याची तयारी
मुंबई : मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात शाळा कशाप्रकारे आणि कधी सुरु करायच्या याच्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाकडून नुकत्याच जारी करण्यात आल्या आहेत.त्यादृष्टीने शिक्षणाधिकारी , स्थानिक प्रशासन यांना सूचना ही देण्यात आल्या आहेत. मात्र एका सर्वेक्षणानुसार शाळा सुरु झाल्यानंतरही केवळ 38. 7 % विद्यार्थी पालकांनीच आपण शाळॆत जाण्याच्या विचार करू असे मत नोंदविले आहे तर 27 . 4 % शाळेत विद्यार्थ्यांना पाठविणार नाही आणि जाऊ की नाही याबद्दल आपण साशंक असल्याचे मत 34 % विद्यार्थी पालकांनी नोंदविले आहे. म्हणजेच तब्ब्ल 61 % पालक आणि विद्यार्थी अद्यापही कोरोनाच्या पार्शवभूमीवर शाळांमध्ये उपस्थिती नोंदविण्यास तयार नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ऑनलाईन लर्निंग मंच असलेल्या ब्रेनली या शिक्षण संस्थेद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले असून देशभरातील 2600 हुन अधिक लोकांच्या , विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया सर्वेक्षणात नोंदविण्यात आल्या आहेत.
पुणे , मुंबई आणि देशातील इतर रेड झोन असणाऱ्या शहरातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांच्या भीतीमुळे विद्यार्थी पालकांच्या मनात भीती कायम आहे. याच कारणामुळे त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया सर्वेक्षणात दिसून आल्या आहेत. दरम्यान शाळा व इतर शैक्षणिक संस्था या काळात बंद असल्याने ऑनलाईन लर्निंगला विद्यार्थी पालकांचा विशेष प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून आले. विशेषतः लॉकडाऊनच्या काळात 55. 2 % विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लर्निंग आणि व्हर्च्युअल क्लासेसला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे 42. 5 % विदयार्थी पालकांनी शाळा सुरु झाल्यानंतरही ऑनलाईन लर्निंग सुरु ठेवणार असल्याच्या प्रतिक्रिया सर्वेक्षणात नोंदविल्या आहेत. ओनलाईन लर्निंग हा शाळांतील प्रत्यक्ष शिक्षणाला सध्यस्थिती असलेला पर्याय असून ते शाळा सुरु झाल्यानंतर ही सुरु ठेवायचे की नाही याबाबतीत 28. 7 % विद्यार्थी पालक अद्याप तरी निर्णय घेऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शाळांमध्ये ऑनलाईन लर्निंग सुरु करण्यासाठी ही काही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. त्यामुळे ऑनलाईन लर्निंगची पद्धत ही कोरोनावर उपचार पद्धती मिळेपर्यंत सुरक्षित असल्याचे मत पालक व्यक्त करत आहेत. सुरक्षित आणि सोशल डिस्टन्सिंग आधारीत इकोसिस्टिमच्या गरजेतून हे परिवर्तन घडत आहे. विद्यार्थ्यी आणि त्यांच्या पालकांसाठी ऑनलाइन लर्निंग ही विकसित होणारी शिक्षण पद्धती आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या स्क्रीन टाइमवर लक्ष ठेवणे आणि त्यांची ऑनलाईन सुरक्षितता याची खबरदारी घेणे ही पालकांची जबाबदारी असल्याच्या ही प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत.