मुंबई, उपनगरात दुर्मीळ पक्ष्यांच्या ६१ प्रजाती; ३८० पक्षीप्रेमींनी केली नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 03:19 AM2019-02-13T03:19:45+5:302019-02-13T03:19:58+5:30
‘बर्ड रेस’ अभियानांतर्गत मुंबईसह वसई येथील नैसर्गिक अधिवासात पक्षिप्रेमींनी नुकतेच पक्षी निरीक्षण केले. शहरात जेथे पक्ष्यांचा अधिवास आहे तेथे ३८० पक्षिप्रेमींनी भेट देऊन दुर्मीळ पक्ष्यांसह इतरही पक्ष्यांच्या नोंदी केल्या.
मुंबई : ‘बर्ड रेस’ अभियानांतर्गत मुंबईसह वसई येथील नैसर्गिक अधिवासात पक्षिप्रेमींनी नुकतेच पक्षी निरीक्षण केले. शहरात जेथे पक्ष्यांचा अधिवास आहे तेथे ३८० पक्षिप्रेमींनी भेट देऊन दुर्मीळ पक्ष्यांसह इतरही पक्ष्यांच्या नोंदी केल्या.
पक्षी निरीक्षणासाठी एकूण ५२ पक्षिप्रेमींचे ग्रुप एकत्र आले होते. वसईतील तुंगारेश्वर, बोरीवली नॅशनल पार्क आणि शिवडी परिसरात पक्षिप्रेमींनी विविध पक्ष्यांच्या प्रजातींच्या नोंदी करून त्याची माहिती गोळा केली. विविध पक्षी पाहून ते सुखावले. मात्र, शहरातील विकासकामांमुळे पक्ष्यांचे प्रमाण कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
३० जणांच्या चमूमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. बोरीवलीतील नॅशनल पार्कमधून पक्षी निरीक्षणाला सुरुवात झाली. पार्कमध्ये २० प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळाले. त्यानंतर शिवडी येथील फ्लेमिंगो पॉइंट येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. या वेळी छोटे फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून आले.
शिवडीमध्ये ट्रान्स हार्बर लिंक रोडचे काम सुरू असून तेथे काहीच प्रमाणात पक्षिप्रेमींना पक्षी पाहता आले. शिवडीनंतर भांडुप पंपिंग स्टेशनकडे पक्षिप्रेमी रवाना झाले. तेथे त्यांना फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळाले. शेवटी पवई लेक येथे जाऊन त्यांनी पक्षी निरीक्षण केले. दिवसभराच्या पक्षी निरीक्षणामध्ये पक्षिप्रेमींना ६१ प्रजातींचे पक्षी पाहता आले. परंतु या वर्षी कमी प्रमाणातच पक्षी दिसून आले, अशी माहिती पक्षिप्रेमी डॉ. अजय प्रधान यांनी दिली.
‘ग्रेट ब्रिटन’ला पाहता आले
नॅशनल पार्कमधून पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली. या वेळी विविध प्रकारचे ४० पक्षी पाहिले. कांदिवली येथील टर्झन तलावात पक्षी निरीक्षणासाठी गेलो असता तेथे या वर्षी दिसलेला सर्वात दुर्मीळ पक्षी म्हणजे ‘ग्रेट ब्रिटन’.
तसेच मोठा तापस, पिवळा तापस, पांढऱ्या मानेचा सुतारपक्षी, सुरमा हळद्या, तांबूस सुतार आणि लालसर छातीची फटाकडी इत्यादी पक्षी दिसून आले, अशी माहिती पक्षिप्रेमी सत्यजीत शिंदे यांनी दिली.
‘बर्ड रेस’ हे वर्षातून एकदा होणारे पक्षी निरीक्षक अभियान आहे. यात ३८० पक्षिप्रेमी सहभागी झाले होते. त्यांचे ५२ ग्रुप तयार करण्यात आले होते. आम्ही वसईतील तुंगारेश्वर भागात पक्षी निरीक्षणासाठी गेलो होतो. या वेळी पेट्रोनिया, गरुड, ब्ल्यु रॉक थ्रुश, पॅराकिट, बुलबुल इत्यादी ५४ विविध प्रकारचे पक्षी पाहता आले.
- कुणाल मुनसिफ,
पक्षी निरीक्षक