मुंबई : महिला बालविकास विभागाने ईलुका कंपनीचा ६१०० रुपयांना मिळणारा मोबाईल ८८७७ रुपयांत खरेदी करून सुमारे ५० कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच तो मोबाईलही विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी विविध खात्यातील कथित घोटाळे बाहेर काढत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महिला बालविकास विभागाने मोबाईल खरेदीचा हा व्यवहार एका दिवसात पूर्ण केला आहे. कौशल्य विकास विभागाने २४ अधिकाऱ्यांच्या ७ ते ८ महिन्यांत बदल्या करून त्यातून सुमारे ५० कोटींचा भ्रष्टाचार केला, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
पर्यटन विभागाने २०१६ ते २०१९ या काळात ३ आयएएस दर्जाचे सचिव आणि पाच व्यवस्थापकीय संचालक बदलले. मामा, मामी, मेहुण्यांच्या नावाने कामांचे वाटप केले गेले. नागपुरात दर दोन तीन दिवसांनी खून होत आहेत. स्थगिती असतानाही ठाण्यात रेमंड कंपनीला १०० एकर जमीन विकसित करण्यास परवानगी दिल्याचा आरोपही त्यांनी केला.मंत्र्यांची गैरहजेरीमंत्रीमंडळात ४३ मंत्री असताना अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत एकही मंत्री सहभागी नव्हता. राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधकांनी राज्यातील मंत्र्यांवर अनेक गंभीर आरोप केले. पण भाजपचे अतुल भातखळकर यांनी केंद्रीय नेत्यांवर झालेल्या आरोपांची यादी वाचत मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.