Join us

अतिदक्षता विभागात वाढविणार ६१२ खाटा; मुंबई महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 1:28 AM

सध्या ८८ टक्के आयसीयू खाटा वापरात

मुंबई : लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले करण्यात येत असल्याने येत्या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांमध्ये खाटांची क्षमता वाढविली आहे. मात्र गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात मर्यादित खाटा उपलब्ध आहेत. यापैकी सध्या केवळ १२ टक्के खाटा शिल्लक असल्याने लवकरच आणखी ६१२ खाटा वाढविण्यात येणार आहेत. 

मुंबईत आतापर्यंत एकूण ८० हजार २६२ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सध्या २३ हजार ७०६ रुग्ण सक्रिय आहेत. अतिदक्षता विभागातील १४३१ खाटांपैकी सध्या केवळ १७४ खाटा उपलब्ध आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत अतिदक्षता विभागातील खाटा नगण्य असल्याने भविष्यात गरज पडल्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे मोठ्या कोविड केअर सेंटरमधील अतिदक्षता विभागात खाटांची संख्या वाढविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या अतिदक्षता विभागाच्या देखभालीसाठी खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या संस्थेमार्फत डॉक्टर, परिचारिका, तज्ज्ञ, टेक्निशियन, वॉर्डबॉय व इतर वैद्यकीय कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या अतिदक्षता विभागात आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याची सर्व जबाबदारी संबंधित संस्थेवर असणार आहे. ही सेवा देण्यास इच्छुक निविदाकाराबरोबर पालिकेची बैठक झाली आहे. याचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर होणार आहे.या ठिकाणी वाढविणार आय.सी.यू. खाटावरळी येथील नॅशनल स्पोटर््स कॉम्प्लेक्स आॅफ इंडियामध्ये सध्या दहा आयसीयू खाटा आहेत. तिथे आणखी ५० खाटा वाढविण्यात येणार आहेत. तर गोरेगाव पूर्व येथे नेस्को कम्पाउंडमध्ये अडीचशे आयसीयू खाटा आहेत. त्यापाठोपाठ वांद्रे-कुर्ला संकुल येथे ११२ आणि मुलुंड येथील सिडको मैदानावर १०० तर दहिसर येथे १०० खाटा उपलब्ध होणार आहेत. 

  • कोविड केअर सेंटरमधील अतिदक्षता विभागाची देखभाल करणाऱ्या संस्थेला पुढील सहा महिन्यांसाठी अथवा कोरोनाचे संकट टळेपर्यंत काम करावे लागणार आहे. 
  • अतिदक्षता विभागात मनुष्यबळ नियुक्ती करणे व २४ तास रुग्णांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर असणार आहे.
  • मुंबईत उपलब्ध अतिदक्षता विभागांमध्ये १४३१ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी १२५७ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर केवळ १७४ खाटा सध्या उपलब्ध आहेत.
  • गेल्या महिन्यात अतिदक्षता विभागातील ९९ टक्के खाटांवर रुग्ण उपचार घेत होते. मात्र जुलै महिन्यात या परिस्थितीमध्ये थोडी सुधारणा दिसून येत आहे. सध्या १२ टक्के खाटा उपलब्ध आहेत.
  • पालिकेच्या आकडेवारीनुसार, ३० जूनपर्यंत मुंबईत ९५७ कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती चिंताजनक होती.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस